#T20WorldCup | स्पर्धेत ICC कडून काही नियमांत पुन्हा बदल, सामन्यात पाऊस पडला तर….

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात रविवारपासून सुरु झालेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीने काही नियमांत पुन्हा बदल केले आहेत. या स्पर्धेतील पात्रता तसेच सुपर 12 गटातील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. या स्पर्धेवर पावसाचा संकट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असूनही असा राखीव दिवस ठेवण्यात आलेला नसल्याने आता चाहत्यांनी टीका सुरु केली आहे.

या स्पर्धेतील सामन्यात पाऊस पडला किंवा सामना टाय झाला तर समान गुण बहाल केले जाणार असून त्यानूसारच जास्त गुण असलेले संघ आगेकूच करतील. या स्पर्धेत विजयासाठी 2 गुण मिळतील. सामना टाय झाला, रद्द करण्यात आला किंवा पाऊस वा अन्य कारणाने सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण बहाल केला जाणार आहे.

प्लेऑफ गटाच्या सामन्यांसाठीच राखीव दिवस ठेवलेला आहे. उपांत्य तसेच अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असून सामन्यांच्या दिवशी पाऊस पडल्यास किंवा अन्य कारणांमुळे सामना होऊ शकला नाही तर सामना राखीव दिवशी होणार आहे. मात्र, जर सामन्यातील षटके कमी करावी लागली व सामना होऊ शकला तर तो सामना त्याच दिवशी पूर्ण केला जाईल. जर निकाल मिळवण्यासाठी असलेल्या निकषानूसार पाच षटकेही होऊ शकत नसतील तरच राखीव दिवस असेल. जर सामना वेळेवर सुरू झाला मात्र, पावसाने व्यत्यय आला तर जीथे सामना थांबलेला असेल त्याच स्थितीपासून राखीव दिवशी सामना सुरु केला जाणार आहे.

नेत्रदीपक सोहळ्याने उद्घाटन

ऑस्ट्रेलियातील गेलॉंग स्टेडियमवर रविवारपासून सुरु झालेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला थाटात प्रारंभ झाला. फटाक्‍यांच्या नेत्रदीपक आतषबाजीने एका खास सोहळ्यात विविध कलाकारांनी आपले कसब दाखवत रंगत आणली. या स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ झाला असून अंतिम लढत येत्या 13 नोव्हेंबरला मेलबर्न (एमसीजी) मैदानावर रंगणार आहे.