आंबेगावातील पेठ गाव 14 दिवस पूर्णपणे “लॉक’

पेठ (वार्ताहर) – येथे 2 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शनिवार (दि. 30) ते दि. 12 जूनपर्यंत पेठ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील सर्व बाजूच्या सीमाबंद करून मेडिकल व दवाखाने वगळता बॅंका, पतसंस्था, बाजारपेठ व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पेठ गाव हे आंबेगाव तालुक्याचे पुणे बाजूने प्रवेशद्वार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेठ गाव पुढील 14 दिवस कडक बंद पाळणार आहे. येथील दाम्पत्य करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या घरातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.  गावातील लोकांना गॅस सिलिंडर गरजेप्रमाणे घरपोच दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबात करोना पॉझिटिव्ह आहेत, त्या कुटुंबातील इतरांना ग्रामपंचायत घरपोच गरजेच्या वस्तू, भाजीपाला, गॅस पुरवणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस कैलास कड यांनी सांगितले. गावात घरोघरी आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी कुटुंब सर्वेक्षण काम सुरू केले आहे. गावातील सर्वबाजूच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले असून प्रशासन विशेष दक्षता घेत आहे.