‘दोषींवर कारवाई करा’; समनापूरच्या घटनेवर महसूलमंत्री विखे यांच्या सूचना

संगमनेर  – सकल हिंदू समाजाने मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यावर घरी परतताना दोन गटांत दगडफेक झाली. परंतु पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री पोलिसांनी या घटनेत 16 जणांना अटक केली आहे. निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही याची काळजी घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी मग तो कोणत्याही धर्माचा असो, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संगमनेरमध्ये एका कार्यक्रमावेळी मंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे 40 ते 50 हजार लोक मोर्चात सहभागी झाले होते. लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहे याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे नाही. परंतु घरी परतताना काही समाजकंटकांनी समनापूर गावात राडा घातला आणि त्यातून दगडफेक झाली, ही घटना निंदनीय आहे. समनापूरच्या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही मग तो कोणत्याही धर्माचा असो. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाईच्या सूचना केल्या असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. शरद पवार यांनी संगमनेर आणि कोल्हापूरच्या दंगलीला विद्यमान सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य संभाजीनगर येथे केले होते.

याबाबत मंत्री विखे यांनी उत्तर देताना म्हटले की, त्यांच्या काळात झालेल्या धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटनेचा पवारांना विसर पडलाय. आपल्या काळात झालेल्या धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटनांकडे आपल्या सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. कधीतरी याबाबत आपल्या पक्षाच्या भूमिका स्पष्ट करा. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली जायची, त्या अडीच वर्षात देशभक्ती करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, याची उत्तरं पवारांनी द्यावी, असेही विखे म्हणाले.