उमरानला सांभाळा, तोच भविष्य आहे ; व्हिटोरी व गावसकर यांचा बीसीसीआयला सल्ला

मुंबई – सनरायझर्स बैदराबादचा वेगवान गोलंदाज जम्मूतावी एक्‍सप्रेस या नावाने ओळखला जाऊ लागलेला उमरान मलिक आता सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीनेही त्याचे कौतुक केले असून उमरानला सांभाळा तोच उद्याच्या भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहे, असे व्हिटोरीने बीसीसीआयला दिलेल्या सल्ल्यात म्हटले आहे. विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही उमरानला तातडीने भारतीय संघात घ्या, अशा शब्दात बीसीसीआयला सांगितले आहे.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हैदराबादकडून खेळताना अफलातून व प्रचंड वेगावान गोलंदाजी करत असलेल्या मलिकने क्रिकेट चाहत्यांनाही आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. उमरानचा वेग फलंदाजांमध्ये धडकी भरवणारा आहे. त्यामुळे त्याला सातत्याने सामने खळवण्यापेक्षा अस्त्र म्हणून वापर केला गेला पाहिजे. वर्कलोड मॅनेजमेंट बीसीसीआयने केले पाहिजे तरच तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ बनेल, असे व्हिटोरीने म्हटले आहे.

ब्रेट ली, डेल स्टेन, शोएब अख्तर व शॉन टेट यांची कारकीर्द संपल्यानंतर इतक्‍या भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज जागतिक क्रिकेटमध्ये मिळत नव्हता. भारतीय संघाला उमरानच्या रूपाने मिळाला आहे. त्याला जपले पाहिजे, त्याला योग्य तेवढी विश्रांतीही दिली गेली पाहिजे. त्याचा वेग अचाट आहे, त्याच्या समोर मोठी कारकीर्द आहे, त्यामुळे त्याला ठेव म्हणून जपणे बीसीसीआयचे कर्तव्य आहे, असेही व्हिटोरीने सांगितले.

ताशी 153-154 किमी वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आता फारसे पाहायला मिळत नाहीत. त्याच्या वेगामुळे सामन्यात एक रोमांच निर्माण होतो. आता भारतीय क्रिकेटमध्ये त्याची येत्या दोन वर्षांत कशा प्रकारे जपणूक होते यावरच त्याची कारकीर्द किती यशस्वी होईल हे लक्षात येईल. भारतातील खेळपट्टीवर सातत्याने वेगवान गोलंदाज करताना काही काळानंतर वेग कमी होतो. त्यामुळे मलिकला सातत्याने खेळवणे योग्य ठरणार नाही, असेही व्हिटोरीने म्हटले आहे.

उमरानला संघात घ्या – गावसकर
उमरान मलिककडे अफाट वेग आहे, अचुकता आहे त्याच्याकडे सातत्याने अत्यंत वेगात चेंडू टाकण्याची क्षमताही आहे. हे सर्व त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सिद्धही केली आहे. त्यामुळे आगामी काळात इंग्लंडसह विविध देशांतील कसोटी मालिकांबरोबरच ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला गेला पाहिजे, अशी आग्रही भूमिका विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी केली आहे.