मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून अशी घ्यावी ‘काळजी’

मायग्रेन हा डोकेदुखीचा एक प्रकार असून याला अर्धे डोके दुखणे किंवा मायग्रेन डोकेदुखी असेही म्हणतात. अनेकांना वरचेवर हा त्रास होत असतो. पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला खूपच वेदना सुरू होतात. याबरोबरच डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास मायग्रेन डोकेदुखीमध्ये होत असतात.
बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, अनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, वातावरणातील बदल, उच्च रक्तदाबाचा त्रास असणे किंवा काही औषधांच्या साईड इफेक्ट्स यासारख्या कारणांमुळे आजकाल मायग्रेनचा त्रास अनेकांना होत आहे.

मायग्रेन डोकेदुखीस कारणीभूत ठरणारे ट्रिगर पुढीलप्रमाणे आहेत.
-डोळ्यांवर एकाएकी खूप प्रकाश पडणे,
-पित्त वाढविणारा आहार घेतल्याने जसे, मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफी अधिक प्रमाणात सेवन करण्यामुळे,
-अपुरी झोप, जागरण करण्यामुळे,
-काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे,
-भरपूर वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीकडे डोळे ताणून दिल्यामुळे,
-डिहायड्रेशनमुळे,
-हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना मायग्रेनचा त्रास होत असतो. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात अनेक महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ लागतो.
-प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हॉर्मोन्समधील बदलांमुळे,
-मोठा गोंगाट कानावर ऐकू आल्यामुळे,
-उग्र वास सहन न झाल्यामुळे,
-मानसिक ताणतणावामुळे,
-दररोजच्या प्रवासामुळे,
-सिगारेट-तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनामुळे मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेनवर डोकेदुखीवर घरगुती उपाय :
आले –
अर्धेडोके दुखत असल्यास आल्याचे तुकडे चावत राहावे. मायग्रेन डोकेदुखीवर आले चावून खाणे उपयुक्त असून यामुळे डोकेदुखी थांबून मायग्रेनमध्ये होणारी मळमळही कमी होते.

दालचिनी –
दालचिनी पावडरमध्ये थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी. मायग्रेनमुळे डोके दुखत असल्यास ही पेस्ट आपल्या कपाळाला लावावी. यामुळे मायग्रेन डोकेदुखी थांबण्यास मदत होते.

लवंग –
मायग्रेन असल्यास काही लवंग तव्यावर गरम करून एका रुमालात गुंडाळून त्या हुंगत राहावे. याशिवाय लवंग बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावल्यानेही मायग्रेन डोकेदुखी कमी होते. अर्धे डोके दुखण्यावर हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी ठरतो.

देशी गाईचे तूप –
मायग्रेन डोकेदुखी असल्यास देशी गाईचे तूप 2-2 ड्रॉप्स नाकात घालावे. देशी गाईच्या तुपात कापूर मिसळून त्याचा लेप कपाळावर लावावा.

थंड पाण्याची पट्टी –
मायग्रेनचा त्रास होऊ लागल्यास ज्या भागात दुखते तेथे थंड पाण्याची पट्टी ठेवा. असे केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल.

जास्त उजेडापासून दूर राहा –
मायग्रेन डोकेदुखीमध्ये डोळ्यासमोर अंधारी येणे, काजवे चमकने अशी लक्षणे सुरवातीला असतात त्यानंतर डोकेदुखी व मळमळ-उलटी होणे हे त्रास होतात. त्यामुळे मायग्रेन डोकेदुखी सुरू होत असताना डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी वाटल्यास जास्त उजेडाकडे पाहणे टाळावे. स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप वापरणे थांबवावे. अशावेळी डोळे बंद करून विश्रांती व झोप घ्यावी.

मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी – Migraine headache solutions :

-मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे, कोणता आहार घ्यावा, काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे.
-संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
-ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
-दिवसभरात किमान 8 से 10 ग्लास पाणी प्यावे.
-मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे. म्हणजे पित्त वाढविणारे पदार्थ खाऊ नका.
-चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
-पोट साफ राहील याची काळजी घ्या.
-स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्हीसमोर सतत बसू नका.
-जास्त प्रकाशाच्या उजेडकडे पाहणे टाळावे.
-जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
-नियमित व्यायाम करावा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
-मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
-वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
-तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
– मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.

हे वाचले का ? उन्हाळ्यात तांब्याचे की माठाचे कोणाते पाणी पिणे जास्त फायदेशीर ? वाचा एका क्लीकवर