सातारा : आरोग्याची काळजी घेतल्यास कॅन्सरला हद्दपार करू

पाचगणी – सध्या कॅन्सरचा आजार धोकादायक पातळीवर आला आहे. मिश्री, धूम्रपान, ताणतणाव आणि आरोग्याकडे वेळीच लक्ष न देणे यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी आपल्या कामाच्या रहाटगाडग्यातून स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे, असे आवाहन कॅन्सर जनजागृती अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसिडर आणि हील रेंजच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांनी केले.

काटवली (ता. जावळी) येथे महिला मंडळ, उमेद, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात सौ. भिलारे बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या पूजा आठवले, सरपंच मीनाक्षी बेलोशे, सदस्या शशिकला बेलोशे, वैशाली खरात, भारती बेलोशे, प्रेरिका सुनीता बेलोशे, जयश्री बेलोशे, सुनंदा बेलोशे, दीपाली गोळे, नूतन पोरे, अश्विनी बेलोशे, सीमा पाटील तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ. भिलारे म्हणाल्या, आपला आहार भेसळयुक्त आहे. पूर्वी शेतीत शेणखत वापरत होतो, आता रासायनिक खताचा मारा आहे. त्यामुळे कुठलाही आजार होताच महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजार वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. एकमेकाला आधार देत कॅन्सरमुक्त अभियान राबवू.

कॅन्सरला पूर्वी अत्याधुनिक औषधोपचार नव्हते, त्यामुळे भीती होती. आता चांगल्या शस्त्रक्रिया होत असल्याने याला प्रतिकार करण्यासाठी संधी आहेत, असे पूजा आठवले यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहून हा आजार बरा होणार यासाठी सकारात्मक राहिल्यास कर्करोगाला हद्दपार करू शकतो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले. कॅन्सर जनजागृती अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसीडरपदी निवड झाल्याबद्दल आणि फ्रान्स विद्यापीठाची डाक्टरेट मिळल्याबद्दल महिलांच्यावतीने डॉ. तेजस्विनी भिलारे यांचा सत्कार करण्यात आला. पूजा आठवले यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मीनाक्षी बेलोशे यांनी स्वागत केले. नूतन पोरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता बेलोशे यांनी आभार मानले.