तामिळी ब्राम्हण मुलांना मिळेनात विवाहासाठी मुली; 40 हजार मुलं वधुच्या शोधात

चेन्नई – तामिळनाडुतील ब्राम्हण कुटुंबातील मुलांना लग्नासाठी सजातीय मुलीच मिळेनाशा झाल्याने तेथे एक मोठीच सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील थामिझंडू ब्राम्हण असोशिएशनने याबाबतीत पुढाकार घेऊन उत्तरप्रदेश बिहार मधुन तामिळी वरांसाठी वधु संशोधनाचे कार्य हाती घ्यायचे ठरवले आहे.

थंबरास ब्राम्हण असे या समाजाला संबोधले जाते. या संघटनेच्या म्हणण्यानुसार तामिळनाडुतील सुमारे चाळीस हजार युवकांची लग्ने केवळ मुली मिळत नसल्याने थांबली आहेत.या संघटनेच्या अध्यक्षांनी ही वस्तुस्थिती कथन करणारे एक जाहीर पत्र संघटनेच्या नोव्हेंबर महिन्यातील मासिकात प्रसिद्ध केले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की आज तामिळनाडुत ब्राम्हण समाजाची 30 ते 40 वयोगटातील सुमारे चाळीस हजार मुले लग्नाविना राहिली आहेत. त्यांना तामिळनाडुत मुलीच उपलब्ध होत नसल्याची एक नवी सामाजिक समस्या उभी राहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की विवाहाच्या वयातील दहा तामिळी ब्राम्हण मुलांपैकी केवळ सहाच मुलांना आज या समाजातील मुली उपलब्ध होऊ शकतात असे आढळून आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आमच्या संघटनेने दिल्ली, लखनौ आणि पाटणा येथे आपले प्रतिनिधी नेमून त्यांच्या मार्फत तामिळनाडुतील युवकांना वधु शोधण्याचे काम आम्ही हाती घेणार आहोत. या संघटनेचे दिल्लीत कार्यालय असून तेथे एक हिंदी भाषिक समन्वयक नेमून तो अन्य ठिकाणच्या प्रतिनिधींशी या बाबत समन्वय साधून काम करणार आहे.

थंबरास ब्राम्हण संघटनेचे प्रमुख एन नारायण यांनी पीटीआयला ही माहिती दिली. या प्रयत्नांना तामिळनाडुतील वरांच्या पालकांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आहे असेही नारायण यांनी म्हटले आहे. या समस्येच्या संबंधात बोलताना शिक्षण तज्ज्ञ एम परमेश्‍वरन यांनी म्हटले आहे की केवळ मुलीच उपलब्ध नाहीत ही यातील समस्या नाही तर मुलांच्या पालकांच्या प्रचंड अपेक्षा हेही या समस्येचे मुळ कारण आहे.

मुलांच्या पालकांना झगमगाटी थाटात विवाह करायचा असतो. हा विवाह समारंभ दोन-तीन दिवस चालतो. त्यात प्रत्येक लग्नाला किमान 12 ते 15 लाख रूपये खर्च येतो. हा खर्च मुलीच्या पालकांनीच करावा अशी मुलांकडच्यांची अपेक्षा असते हा प्रकार अत्यंत घातक आहे. लग्नाच्या खर्चाला आणि खोट्या प्रतिष्ठेला मुरड घातली तरी ही समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक कुटुंबानेच साधेपणाची अंगीकार केला आणि खोट्या प्रतिष्ठेला मुरड घातली की या मुलांना तामिळनाडुतच वधु उपलब्ध होऊ शकते. त्या खेरीज ब्राम्हण समाजातील परस्पर विरूद्ध पोट जातीत विवाह निषीद्ध मानला जातो. असल्या जुनाट प्रथाही याला कारणीभूत आहेत असे अनेकांचे म्हणणे आहे.