Senthil Balaji : तमिळनाडूच्या ऊर्जामंत्र्याला ईडीकडून अटक; 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

चेन्नई :- तामिळनाडू परिवहन विभागातील नोकऱ्यांसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे वीज आणि उत्पादन शुल्क मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. मुख्यमंत्री एमके स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अशा कारवाईचा सामना करणारे सेंथिल हे पहिले मंत्री आहेत.

मुुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, बालाजीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, मग, चौकशीची काय गरज आहे. ईडीची अशी अमानवी कारवाई योग्य आहे का?

वर्ष 2014-15 मध्ये गुन्हा घडला तेव्हा बालाजी अण्णाद्रमुकमध्ये होते आणि त्यावेळी परिवहन मंत्री होते. बालाजी यांना मंगळवारी सकाळी 1.30 च्या सुमारास छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर औपचारिकरित्या अटक करण्यात आली आणि नंतर त्यांना शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्यांना “लवकरात लवकर” बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यानंतर बालाजीने पुढील उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मागण्यासाठी शहर न्यायालयात धाव घेतली आणि अंतरिम जामिनासाठी अर्जही केला.

प्रदीर्घ चौकशीनंतर बालाजीला अटक करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यानंतर चेन्नई येथील स्थानिक न्यायालयाने बालाजीला 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने मंत्र्याच्या अंतरिम जामिनासाठी केलेल्या अर्जावर आणि त्यांना खासगी रुग्णालयात पाठवण्याची परवानगी देण्याच्या विनंतीवरील आदेश राखून ठेवले आहेत. बालाजीच्या पोलीस कोठडीसाठी ईडीने केलेल्या विनंतीवरही हा आदेश राखून ठेवण्यात आला होता.

परिवहन महामंडळात 2014-15 या वर्षात चालक, ऑपरेटर, कनिष्ठ व्यापारी, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता म्हणून भरतीसाठी उमेदवारांकडून लाच घेण्याचा कट रचण्यात आला होता.

ईडीने आरोप केला आहे की “संपूर्ण भरती प्रक्रिया फसव्या आणि अप्रामाणिक पद्धतीने केली गेली होती” आणि षणमुगम, अशोक कुमार आणि कार्तिकेयन यांनी प्रदान केलेल्या यादीनुसार बालाजीच्या सूचनेनुसार पार पाडली गेली.