तामिळनाडूतील मेंढपाळाच्या मुलाला व्हायचंय डॉक्‍टर

चेन्नई, दि. 19 – मेंढपाळ वडील आणि शिलाईकाम करणारी आई यांची स्वप्ने साकार करण्यासाठी तामिळनाडूमधील “नीट-टॉपर’ आणि बारावीच्या परीक्षेतील टॉपर ठरलेल्या जिवितकुमारला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. मात्र, घरात अठराविसे दारिद्रय असल्याने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरायलाही जिवितकुमारकडे पैसे नसल्याने त्याचे शिक्षक आर. शबरीमला यांनी एका व्हिडीओद्वारे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

जिवितकुमारने गेल्या वर्षी बारावीच्या परिक्षेत 600 पैकी 548 गुण मिळवून लक्षणीय कामगिरी केली, तर अखिल भारतीय वैद्यक प्रवेश परिक्षेत त्याने 664 गुण मिळवून लक्ष वेधून घेतले होते. कोणताही खासगी शिकवणी न लावता त्याने केलेल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

अमेरिकेतील एका समाजसेवकाने जिवितकुमारला आता 75,000 रुपयांची मदत केली असून उर्वरीत 50 हजार रुपयांसाठी शबरीमला यांनी सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या जिवितकुमारच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आपच्या मुलाला कोणतीही खासगी शिकवणी लावणे आमच्या आर्थिक कुवतीबाहेरचे होतेच; शिवाय त्याची कॉलेजची फी भरण्यासाठी मी स्वत: 100 दिवस शिवणकाम केले. त्यामधून आलेल्या पैशांतून आम्ही जिवितकुमारला योग्य शिक्षण देऊ शकलो. आता तो डॉक्‍टर बनून समाजाच्या उपयोगी पडेल, तो दिवस आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असेल असे जिवितकुमारच्या आईने वृत्तसंस्थेला सांगितले.

Leave a Comment