टाटा भारतात बनवणार आयफोन, 125 दशलक्ष डाॅलरला विकत घेतला विस्ट्रॉन प्लांट

iPhone : टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे. आता टाटा समूहाकडून आयफोनचे उत्पादन भारतात केले जाईल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज (27 ऑक्टोबर) रोजी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X द्वारे दिली आहे.

राजीव चंद्रशेखर यांनी लिहिले की, केवळ अडीच वर्षाच्या आत टाटा समूह भारतात आयफोन बनवणे सुरु करेल. टाटा टीमचे अभिनंदन. भारतीय कंपन्यांसह भारतातून जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी अॅपलचे हे अतिशय चांगले पाऊल आहे.

iPhone 14 ची निर्मिती विस्ट्रॉनच्या कारखान्यात –
अहवालानुसार, विस्ट्रॉनच्या कारखान्याचे मूल्य अंदाजे 125 दशलक्ष डाॅलर इतके आहे. टाटा समूह आणि विस्ट्रॉन यांच्यात गेल्या एक वर्षापासून या करारासाठी चर्चा सुरू आहे. विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन-14 मॉडेलच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. सध्या या प्लांटमध्ये 10,000 हून अधिक कामगार काम करतात.

विस्ट्रॉनने 2008 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला, तेव्हा कंपनी अनेक उपकरणांसाठी दुरुस्ती सुविधा पुरवत असे. यानंतर, 2017 मध्ये, कंपनीने आपल्या कार्याचा विस्तार केला आणि Apple साठी आयफोनचे उत्पादन सुरू केले.

टाटा समूह मीठ विकण्यापासून ते तांत्रिक सेवा पुरविण्यापर्यंत अनेक प्रकारच्या व्यवसायात गुंतलेला आहे. अलीकडच्या वर्षांत, समूहाने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रवास सुरू केला आहे. समूह सध्या तामिळनाडू राज्यातील त्यांच्या कारखान्यात आयफोन चेसिस तयार करतो. ते डिव्हाइसची मेटल बॉडी बनवते. याव्यतिरिक्त, चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी यापूर्वी चिपमेकिंग व्यवसायात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.