एअर इंडियासाठी टाटांना गुंतवावे लागणार 37 हजार कोटी रुपये

मुंबई – मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. मात्र या कंपनीचे पूर्णपणे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढील पाच वर्षात टाटा समूहाला 37,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे दिसून येते.
टाटा समूहाने एअर इंडियाचे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज अगोदरच स्वतःकडे घेतले आहे.

आगामी काळातही या कंपनीला चालू ठेवण्यासाठी गुंतवणूक करत राहावी लागणार आहे. सध्या टाटा समुहाकडे तीन नागरी विमान वाहतूक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे एकत्रीकरण करण्याचा शक्‍यतेवर विचार करावा लागेल. त्याचबरोबर विमानाच्या तिकिटाची किंमत किमान 15 टक्‍क्‍यांनी वाढविण्याची गरज आहे.

एअर इंडियाकडे बोईंग 777 विमानाचा ताफा आहे. सध्याच्या परिस्थितीत ही विमाने अकिफायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या विमानांची संख्या कमी करावी लागेल. एअर इंडिया बऱ्याच अकिफायतशीर मार्गावर आपली सेवा देत होती. या मार्गाची फेररचनाही टाटा समूहाला करावी लागणार आहे. एअर इंडियाकडे 12,085 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

या कर्मचाऱ्यांचा इतर कामासाठी वापर करून घ्यावा लागणार आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष तरी काढता येणार नाही. मात्र स्वैच्छा निवृत्ती योजना आकर्षक करून काही कर्मचारी कमी करण्याचा शक्‍यतेवर विचार करावा लागणार आहे. दरम्यान नव्या संचालक मंडळाच्या प्रमुख पदावर एन चंद्रसेखरण काही काळ काम करण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काही ज्येष्ठ उद्योजकांची नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे.