ई-कॉमर्स क्षेत्रात TATAची एन्ट्री; छोट्या कंपन्यांना होणार मोठा फायदा

मुंबई – टाटा समूहाने टाटा न्यू हे ऍप सादर करून ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा न्यू हे ऍप ओपन आर्किटेक्‍चरवर आधारित आहे. त्यामुळे या ऍपवरून इतर कंपन्यांनाही आपल्या वस्तू आणि सेवा विकता येणार आहेत.

7 एप्रिल रोजी हे ऍप सुरू झाल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 22 लाख लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले. आगामी काळातही ऍप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढण्याची शक्‍यता असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले.

भारतामध्ये भारतीय कंपन्यांनी ई-कॉमर्स सुरु करावे. या दृष्टिकोनातून गृहपाठ करून हे ऍप विकसित करण्यात आले आहे. याला भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या प्रतिसादाच्या आधारावर या ऍपमध्ये निरंतर सुधारणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ऍपवरून टाटा समूहातील शेकडो कंपन्यांच्या सेवा आणि वस्तू ग्राहकांना कमीत कमी वेळेत कार्यक्षमरित्या पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकूणच टाटा समूहाची उलाढाल आगामी काळामध्ये वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा त्यांनी केला.