T20 World Cup 2024 : टीम इंडिया पोहोचली न्यूयॉर्कला.! ‘हे’ 3 खेळाडू उशिरानं होणार संघात सामील, BCCI ने शेअर केला व्हिडिओ…

Team India reached New York for T-20 World Cup : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी संघाच्या न्यूयॉर्कमध्ये पोहचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 25 मे रोजी मुंबई विमानतळावरून संघ अमेरिकेला रवाना झाला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय खेळाडूंची पहिली तुकडी अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी रविवारी न्यूयॉर्कला पोहोचली. रोहितसोबत 10 सदस्यांची टीम आली, पण त्यात संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि स्टार फलंदाज विराट कोहली,संजू सॅमसन यांचा समावेश नव्हता. हे तिघे काही दिवसांनी संघात सामील होतील. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बाकीचे सपोर्ट स्टाफही न्यूयॉर्कला पोहोचले.

कर्णधार रोहितशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचाही पहिल्या तुकडीत समावेश आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल आणि खलील अहमद हे राखीव खेळाडूही उपस्थित होते.

कोहली, हार्दिक आणि सॅमसन उशिरानं होतील संघात सामील…

कोहलीने बुधवारी अहमदाबादमध्ये आयपीएल एलिमिनेटर सामना खेळला. तो नंतर संघात सामील होईल. आयपीएलचा लीग टप्पा संपल्यानंतर हार्दिक ब्रिटनला गेला होता. कर्णधार हार्दिकच्या नेतृत्वाखाली पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 हंगामाच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती. राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी रात्री चेन्नईमध्ये दुसरा क्वालिफायर खेळला. त्यामुळे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल आणि आवेश खान (राखीव) सोमवारी उशीरा न्यूयॉर्कला रवाना होतील.

T20 World Cup 2024 : आयपीएल संपली, आता टी-20 वर्ल्ड कपचा थरार होणार सुरु, जाणून घ्या Team India च्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक…

बांगलादेशविरुद्ध खेळणार सराव सामना…

न्यू यॉर्कला पोहोचल्यानंतर, संघ काही दिवस विश्रांती घेईल आणि नंतर नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांग्लादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळेल. भारतीय संघ या नवीन स्टेडियममध्ये तीन साखळी सामने खेळणार आहे, ज्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जून रोजी होणाऱ्या सामन्याचा समावेश आहे. या स्टेडियमचे बांधकाम जानेवारीत सुरू झाले आणि याच महिन्यात पूर्ण झाले.

टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक –

पहिला सामना 05 जून, बुधवार – भारत विरुद्ध आयर्लंड – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
दुसरा सामना 09 जून, रविवार – भारत विरुद्ध पाकिस्तान – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
तिसरा सामना, बुधवार, 12 जून – भारत विरुद्ध यूएसए – (नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क)
चौथा सामना, 15 जून, शनिवार – भारत विरुद्ध कॅनडा – (सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा)

रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचाविश्वचषकाच्या अ गटात समावेश आहे ज्यात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 2013 पासून भारताने आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही. यूएस प्रथमच आयसीसी स्पर्धेचे को-होस्टिंग करत आहे आणि त्याचा राष्ट्रीय संघ देखील जागतिक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. यावेळी टी-20 विश्वचषक दोन देशांमध्ये आयोजित केला जात आहे. अमेरिकेशिवाय या जागतिक स्पर्धेचे सामने वेस्ट इंडिजमध्येही खेळवले जाणार आहेत.