काश्मीरमधील तेहरिक-ए-हुर्रियत संघटनेवर बंदी ! ‘या’ कारणामुळे मोदी सरकारने घेतला निर्णय

नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने ‘तेहरिक-ए-हुर्रियत या काश्‍मीरातील संघटनेवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी जारी केली आहे.या निर्णयाद्वारे या संघटनेला आता बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या संबंधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत या संघटनेला युएपीए अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संघटना फूटीरवादी कारवायांमध्ये गुंतली आहे.

जम्मू काश्‍मीरात त्यांनी अलिप्ततावादाला खतपाणी घातले आणि भारतातून फूटून जाण्यासाठी कारवाया केल्या. दहशतवादाविरुद्धच्या शून्य-सहिष्णुतेच्या पंतप्रधानांच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटना यांच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी नमूद केले.

या गटाचे सदस्य सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत आणि ते देशात दहशतवादाचे साम्राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहेत. ज्यामुळे राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.