20 हजारांची लाच घेताना तहसीलदाराला अटक; एका आठवड्यात 3 वरिष्ठ अधिकारी ACBच्या जाळ्यात

अहमदनगर – सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेण्याचा प्रकार चिंताजनक बनला आहे. याच आठवड्यात सोमवारी नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला 30 लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर आता शनिवारी कोपरगाव येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील ही घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विजय बोरुडे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव असून नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. वाळूची गाडी सोडण्यासाठी एका खाजगी पंटरमार्फत ही लाच स्वीकारताना बोरुडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एका वाळू व्यावसायिकाने तक्रार केली होती. पकडलेला वाळूचा डंपर कोणतीही केस न करता सोडून देण्यासाठी बोरूडे यांनी लाच मागितली होती. लाचेची रक्कम पंटरकडे देण्यास सांगितले. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून एसीबीच्या पथकाने खासगी इसम गुरमितसिंग दडियल याला 20 हजाराची लाच घेताना पंचासमक्ष पकडले.

याबाबत 17 मे रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. लाच मागितल्याचे निष्पत्र झाल्यानंतर एसीबीने शनिवारी कोपरगांव तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात बोरुडे आणि दडियल अडकले. कोणत्याही अधिकाऱ्याने कसल्याही कामासाठी लाच मागितल्यास त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, एकीकडे महसूल मंत्री विखे पाटील यांनी नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात राज्यातील पहिला वाळू डेपो सुरु करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना एक ब्रास वाळू सहाशे रुपयांत मिळत आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही वाळू तस्करी जोरात सुरु असल्याचे या घटनेवरुन अधोरेखित झाले आहे.