पिंपरी | महिलांसाठी तेजस्वीनी धावणार- महिला दिनी मोफत बससेवा

पिंपरी, (प्रतिनिधी) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवास करता येणार असून महिलांसाठी असलेल्या तेजस्वीनी बसमधून त्यांना प्रवास करता येणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. ८) दोन्ही शहरातील दोन १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार आहे. महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महिला प्रवाशांसाठी पीएमपीतर्फे तेजस्वीनी ही बससेवा सुरू आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये महिलांसाठी राखीब जागाही ठेवण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी असलेल्या या तेजस्वीनी बसमधून येत्या शुक्रावारी (दि. ८) दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील १७ महिला विशेष बसमधून महिलांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेगुरव, हिंजवडी, निगडी आणि डांगे चौक यासह पुणे व पिंपरीए-चिंचवड शहरातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे.

मोफत सेवा (कंसात मार्ग क्रमांक)
मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७), चिखली ते डांगे चौक (३५५) यासह पुण्यातील स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४), एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२),

कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३) या बसचा समावेश आहे.

महाशिवरात्रीसाठी घोरावडेश्‍वरला बस
महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी शुक्रवारी (दि. ८) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्वाच्या बसस्थानकांवरून बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातून तसेच उपनगरातून अनुक्रमे निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

या भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून या मार्गांवर बसस्थानकांवरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. निगडी, पवळे चौक ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा, शंकरवाडीपर्यंत बस उपलब्ध असणार आहे. पहिली फेरी पहाटे ५.२० मिनीटांनी असले.

तर, बसमार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ५ मार्गांवर एकूण २० बस सरासरी १० ते १५ मिनीटांच्या वारंवारितेने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.