रेल्वेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी पथक’

पुणे – रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता रेल्वे सुरक्षा दलाने विशेष “तेजस्विनी पथक’ तैनात केले आहे. त्यामध्ये हे पथक महिलांबरोबर प्रवासासह त्यांच्या अडचणीही समजून घेणार आहे. यासाठी तत्काळ मदतीसाठी व्हॉट्‌सऍप ग्रुपसह हेल्पलाइन क्रमांकही शेअर करण्यात आला आहे.

पुणे रेल्वे विभागातून अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल गाड्या धावतात. या गाड्यांमधून कामानिमित्त किंवा गावाला जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकामध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या तीन महिला असणार आहेत. या पथकाकडून रेल्वे गाड्यांमध्ये पुणे ते लोणावळ्यापर्यंत प्रवास करून महिला सुरक्षा देण्याचे काम केले जात आहे.

डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड एक्‍स्प्रेस आणि दैनंदिन लोकल सेवांमध्ये दररोज महिला प्रवाशांशी पथकातील कर्मचारी व अधिकारी संवाद साधत आहेत. या पथकावर “आरपीएफ’च्या हडपसर ठाण्याच्या निरीक्षक प्रिती कुलकर्णी देखरेख ठेवतील. एकट्याने प्रवास करीत असलेल्या महिला प्रवाशांना आवश्‍यक सुरक्षा आणि आत्मविश्‍वास देण्याचे काम पथकाकडून केले जात आहे. तसेच, रेल्वेतून प्रवास करताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याबद्दल व अनोळखी व्यक्‍तीकडून कोणतेही खाण्याचे पदार्थ स्वीकारण्यापासून परावृत्त करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

  • महिलांशी संवादासाठी “व्हॉट्‌सऍप ग्रुप’
  • प्रवासी महिलांशी संवादासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुप सुरू
  • या ग्रुपच्या माध्यमातून महिला “आरपीएफ’ला मदत मागू शकतात
  • महिलांसाठी 139 हा हेल्पलाइन क्रमांक
  • सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक 7219613777
  • एकट्या महिलाबरोबर पथक प्रवास करतात

“रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटले पाहिजे. यासाठीच तेजस्वीनी पथक तैनात केले आहे. तसेच, पुणे विभागाचे नेतृत्व एक महिला करीत असून महिला प्रवाशांची आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याविषयी तत्पर आहोत.” – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग