Terrorist Attack : पोलिओ लसीकरण पथकावर बॉम्बहल्ला; ६ पोलीस ठार तर २२ जण जखमी

Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात लसीकरण पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले ६ पोलीस ठार झाले आहेत. तर अन्य २२ जण जखमी झाले आहेत. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या मामुंड तालुक्यात हा बॉम्बस्फोट झाला. पोलिओ लसीकरण पथकाला सुरक्षा पुरवण्यासाठी हे पोलीस पथक जात असताना पोलिसांच्या वाहनाला बॉम्बने उडवून देण्यात आले. जखमी पोलिस कर्मचार्‍यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असून सरकारी हॉस्पिटलमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जेथे हा बॉम्बस्फोट झाला, तेथील आरोग्य सुविधा स्थगित करण्यात आल्या आहेत. पोलिओ लसीकरण पथक मात्र सुरक्षित आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. खैबर पख्तुन्ख्वा प्रांताचे हंगामी मुख्यमंत्री अर्षद हुसैन यांनी या बॉम्बस्फोटाचा जोरदार निषेध केला आहे. अखेरचा दहशतवादी जिवंत असेपर्यंत दहशतवादाविरोधातील युद्ध सुरूच असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

कट्टरवाद्यांकडून पोलिओ लसीकरणाला मोठा विरोध होतो. त्यामुळे पोलिओ लसीकरण पथकांवर सातत्याने हल्ले केले जात असतात. तालिबान दहशतवाद्यांनी पूर्वी शेकडो लसीकरण कर्मचारी आणि पोलिसांची अशा हल्ल्यातून हत्या केली आहे.