दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनची हत्या; 24 तासातील दुसरी घटना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितांवर केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच  इथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात  एका काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनची गोळी मारून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बांदिपुरा जिल्ह्याीतील रहिवासी मोहम्मद इब्राहिम यांना बोहरी कदल येथे रात्री 8 वाजता गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. गोळी मारल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली. जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सेल्समनच्या हत्येनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, “इब्राहिमची हत्या ही निषेधार्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.” गेल्या काही आठवड्यात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.

रविवारी बटमालू परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्स्टेबलची हत्या केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 8 वाजता दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिर पोलिसचे कॉन्स्टेूल तौसीफ अहमद यांच्या बटमालू येथील एसडी कॉलनी परिसरात गोळी झाडली.