अर्थकारण : टेस्लाची भारताकडे पाठ

“टेस्ला’चे सीईओ ऍलन मस्क यांनी भारतात टेस्ला कारच्या उत्पादनाचा कारखाना तूर्तास स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याबाबत विश्‍लेषण…

भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित उभारी मिळू शकलेली नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत विकासदर 4.1 टक्‍के इतकाच नोंदवण्यात आला असून, त्या आधीच्या तीन तिमाहींच्या तुलनेत हा सर्वात कमी विकासदर आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केल्यामुळे त्याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. निर्मिती उद्योग, खाणकाम, बांधकाम आणि कृषी क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे एवढी तरी प्रगती झाली. परंतु आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमतीने पिंपामागे 120 डॉलरपर्यंत मजल मारली असून, त्यात परकीय गुंतवणूकदारांची निरंतर माघार सुरू असून, यामुळे रुपयाचा नवीन नीचांक गाठला गेला आहे.
परंतु या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे, एप्रिल 2021 मध्ये भारतातून 46 हजार कार्स निर्यात करण्यात आल्या. एप्रिल 2021 मध्ये हा आकडा 42 हजार युनिट्‌स इतका होता. भारतात तयार होत असलेल्या काही कार्स विदेशात लोकप्रिय होत असून, ही एक दुर्मीळ अशी सुवार्ता आहे.

“किआ सेल्टोस’ या कारची सगळ्यात जास्त निर्यात झाली आहे. एप्रिलमध्ये अशा पाच हजारांहून अधिक गाड्या विदेशात धाडण्यात आल्या. मारुती सुझुकीच्या स्विफ्टची एप्रिल 2022 मध्ये 4,165 इतक्‍या गाड्यांची, तर डिझायरची 2,700 गाड्यांची निर्यात करण्यात आली. त्याचप्रमाणे ह्युंदाई सॅंट्रोच्या 3,300 कार्सची निर्यात करण्यात आली. अगोदरच्या वर्षांपेक्षा निर्यातीत भरघोस वाढ झाली असून, ही दिलासादायक बाब आहे. टाटा अल्ट्रोज ऑटोमॅटिक, आर्टिगा, एक्‍सएल 6 आणि जीप मेरिडियन अशा नवनव्या गाड्या बाजारात आलेल्या आहेत.

इलेक्‍ट्रिक कार्सबाबत बोलायचे झाले तर, टाटा नेक्‍सन ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. तिची किंमत आता 25 हजार रुपयांनी महागली असून, ती 14 ते 17 लाखांच्या घरात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर “टेस्ला’ ही कंपनी मात्र भारतात आपल्या कार उत्पादनाचा कारखाना तूर्तास स्थापन करणार नाही, असे टेस्लाचे मुख्याधिकारी ऍलन मस्क यांनी जाहीर केले असून, हा भारताला धक्‍काच आहे. जगात इलेक्‍ट्रिक वाहने निर्माण करणारी टेस्ला ही अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतात कार विकण्याची आणि त्याबाबत सुविधा देण्याची परवानगी मिळाल्याखेरीज आपण भारतात उत्पादन करणार नसल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. “तुम्ही चीनमध्ये कारची बांधणी करणार आणि तिची भारतात विक्री करणार, हे आम्हाला मान्य नाही’, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, विक्रेतेही आहेत आणि कौशल्यही आहे, असा भारत सरकारचा युक्‍तिवाद आहे.

टेस्लाचा कारखाना भारतात आला असता, तर प्रचंड मोठी गुंतवणूक येथे आकर्षित झाली असती. या कारखान्यास लागणारे सुटे भाग आणि घटक भारतातून पुरवले गेले असते. मोठ्या प्रमाणात रोजगार तयार झाला असता. गेल्या वर्षी टेस्लाने बेंगळुरू येथे कार्यालयाची नोंदणीही केली होती. त्यामुळे भारतातील “कंपोनंट’ उद्योग सुधारण्याची आणि वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र, भारतात आयातकर मोठ्या प्रमाणात असून, टेस्ला व ऑडीसारख्या कंपन्यांना यामुळे भारतात गुंतवणूक करण्याबाबत पुनर्विचार करावासा वाटला. टेस्लाने चीनमध्ये नव्हे, तर भारतातच उत्पादन करावे, अशी आपली इच्छा आहे. आता टेस्ला भारताऐवजी इंडोनेशियाचा विचार करत असल्याची बातमी आहे. या संदर्भात मस्क यांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत भेटही झाली आहे. भारतात 30 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या आयात केल्या जाणाऱ्या कारवर 100 टक्‍के आयातकर लागू होतो. टेस्लावरही हा कर लागू होतो. त्यामुळे येथे ही कार खूपच महाग होते.

मस्क यांना भारताचा केवळ एक बाजारपेठ म्हणून विचार करायचा आहे. तर येथे कारनिर्मिती करून पूरक उद्योगांचा विकास करा, असा भारताचा आग्रह आहे. जगाच्या बाजारपेठेत इलेक्‍ट्रिक कार्स पाठवण्यासाठी मॅन्युफॅक्‍चरिंग हब म्हणून भारताचा विचार करावा, हा भारत सरकारचा हट्ट योग्यच आहे. परंतु बहुराष्ट्रीय कंपन्या या नेहमीच केवळ आपल्या फायद्याचाच विचार करतात.

मस्क हा कॅनेडियन अमेरिकन असून, तो टेस्ला मोटर्स या जगद्विख्यात कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. स्पेस एक्‍स आणि सोलर सिटी या कंपन्याही त्यांच्याच आहेत. मस्कची आई कॅनेडियन आणि वडील दक्षिण आफ्रिकेतील आहेत. त्यांचे लहानपण दक्षिण आफ्रिकेतच गेले. अर्थशास्त्र आणि पदार्थविज्ञान या विषयांतील पदवी संपादन केल्यानंतर 1995 साली ते कॅलिफॉर्नियात आले आणि झिप2 ही वेब सॉफ्टवेअर कंपनी त्यांनी स्थापन केली. झिप2 ही स्टार्टअप कंपनी 1999 साली कॉम्पॅक या कंपनीने 30 कोटी डॉलर्सला खरेदी केली. त्याचवर्षी मस्कने एक्‍स डॉटकॉम ही ऑनलाइन बॅंक स्थापन केली. पुढच्याच वर्षात ही बॅंक “कॉन्फिनिटी’त विलीन झाली आणि त्यातूनच पुढे “पेपाल’ची स्थापना झाली. 2002 साली पेपाल “ईबे’ने दीड अब्ज डॉलर्सला खरेदी केली. 2002 मध्येच मस्कने स्पेस एक्‍स ही एरोस्पेस उत्पादन व अवकाश वाहतूक सेवा कंपनी स्थापन केली. 2004 साली टेस्ला मोटर्सचा संस्थापक म्हणून त्यांचे नाव झाले आणि इलेक्‍ट्रिक वाहनांचा उत्पादक म्हणून त्यांनी आपली नाममुद्रा कोरली.

मस्कचे व्यक्‍तिमत्त्व ठाम आणि आक्रमक आहे. टेस्लाचे उत्पादन भारतात आणण्याबाबत मस्क विचार करत होते. भारतातून त्यांच्याकडे ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडत होता. एवढेच कशाला, महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, पण तुम्ही या, असे आमंत्रण दिले होते. परंतु भारतात सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून, उत्पादनाच्या प्रारंभाची वेळ सांगू शकत नाही, असे मस्क पत्रकारांजवळ म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे केंद्र सरकारचे अधिकारी नाराज झाले होते. भारतातील उत्पादनासाठी वचनबद्धता टेस्ला जाहीर करत नाही, तोपर्यंत शुल्क कपातीची मागणी करण्याचा तिला अधिकारच नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा, यासाठी तेलंगण, पंजाब, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल वगैरे राज्यांचे मुख्यमंत्री आग्रही होते. आता मात्र या सगळ्याच स्वप्नांवर पाणी पडले आहे.