राज्यात टेक्‍सटाईल पार्क उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नुकतंच महाराष्ट्रात इलेक्‍ट्रॉनिक मॅन्युफॅक्‍चरिंग क्‍लस्टर (ईएमसी) येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच नवीन वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्‍सटाईल पार्कदेखील देणार आहे. राज्यात टेक्‍सटाईल क्‍लस्टर तयार होणार आहे. याचे प्रपोजल अंतिम टप्प्यात सादर झाले आहे. बजेटपर्यंत याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानत हा प्रकल्प म्हणजे राज्यासाठी केंद्र सरकारने दिलेले गिफ्टच असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्यात नवा प्रकल्प येणार आहे. हे होत असताना एकीकडे महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीनच महिने झाले तरीही फेक नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न होत आहे.

महाराष्ट्रातून उद्योग चाललेत. या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार पाच एचएमवी पत्रकार. एचएमवी म्हणजे हिज मास्टर्ज व्हॉईस. असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

मागच्याच कॅबिनेटमध्ये 25 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. आज पुन्हा एकदा 25 हजार कोटींचे प्रपोजल एका मिटिंगमध्ये मान्य झाले आहे, ही महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले.

रिफायनरी महाराष्ट्रातच होणार
गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. आजपर्यंत देशामध्ये कधीच गुंतवणूक झाली नाही इतकी गुंतवणूक रिफायनरीमध्ये आहे. यामुळे 3 लाख कोटीपेक्षा गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. यातून 1 लाख लोकांना थेट आणि इतर रोजगार उपलब्ध होणार आहे. पण अशा रिफायनरीला विरोध केला जात आहे. रिफायनरी होणारच, ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण महाराष्ट्रातच पूर्ण रिफायनरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.