ठाकरे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर फोडले पराभवाचे खापर

छत्रपती संभाजीनगर  – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मोठे आव्हान उभे केले होते.

ज्यामुळे या निवडणुकीत खैरेंचा पराभव झाला असून त्यांनी या पराभवाचे खापर त्यांच्याच पक्षातील सहकारी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर फोडले आहे. ज्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे 4 लाख 76 हजार 130 मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना दुसऱ्या क्रमांकाचे 3 लाख 41 हजार 480 मते मिळाली. तर ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना केवळ 2 लाख 93 हजार 450 मते मिळाली आहेत.

परंतु, पक्षाचे नेते अंबादास दानवे यांन नीट प्रचार न केल्याने, मतदारसंघामध्ये नीट काम न केल्याने पराभव झाल्याचे खैरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबतची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यामुळे आता ठाकरे गटातील या दोन नेत्यांचा वाद पुन्हा एकदा मातोश्रीपर्यंत जाणार आहे.