“रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश म्हणजे फडणवीसांच्या कपटी राजकारणाला…” ; ठाकरे गटाची सडकून टीका

Thackeray group on Fadnavis। नरेंद्र मोदींनी काल इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात निवडूण आलेल्या बहुतांश राज्यातील खासदारांचा समावेश करण्यात आला. खास करून महाराष्ट्रातील सहा खासदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. यात रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. यावरूनच ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आलीय. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.

ही तर देवेंद्र फडणवीसांना चपराक Thackeray group on Fadnavis।

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्यांच्यासह भाजपा आणि घटक पक्षांतील काहींनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, पीयूष गोयल, ज्योतिरादित्य शिंदे ही नावं आहेत. महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळाली. रक्षा खडसेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातला प्रवेश ही फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कपटी राजकारणास दिल्लीने लगावलेली चपराक आहे. त्यासाठी विनोद तावडेंनी विशेष श्रम घेतलेले दिसत आहेत. महाराष्ट्रात आम्ही ठरवू तेच मंत्री वगैरे होतील असे फडणवीस वगैरे लोकांना वाटत होते ते यावेळी घडले नाही. नारायण राणे, भागवत कऱ्हाड यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात आला आहे. तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडचे खासदार मंत्रिमंडळात आले आहेत. असं म्हणत सामनातून देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे.

दोन बाबूंना मोदी-शाहांची भीती  Thackeray group on Fadnavis।

केंद्रीय मंत्रिमंडळात तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडचे मंत्री समाविष्ट केले आहेत. पण तेलुगू देसम दोन मुख्य मागण्या आहेत. एक म्हणजे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रीपद असता कामा नये व लोकसभेचे स्पीकरपद तेलुगू देसमकडे असावे. या दोन्ही मागण्या म्हणजे मोदी सरकारचे कान आणि नाक कापण्यासारख्या आहेत. तेलुगू देसमला अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण सरकार स्थिरस्थावर झाल्यावर अमित शाह हे त्यांचा जुनाच खेळ सुरु करतील व संसदेतला तेलुगू देसम पक्ष फोडतील. नितीश कुमार यांनाही तेच भय आहे. त्यामुळे लोकसभेच्या ‘स्पीकर’पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा नेता असावा, अशी मागणी जोर धरत आहे. याचा अर्थ नवे सरकार हे अविश्वासाच्या पायावर बनत आहे. मोदी हे रालोआच्या नेत्यांना मिठ्या मारण्याचे नाटक करीत असले तरी त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. हे लोक विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असेच नितीश व चंद्राबाबूंना वाटत आहे आणि हेच सरकारच्या अस्थिरतेवर शिक्कामोर्तब आहे, असा अंदाज ‘सामना’तून व्यक्त करण्यात आला आहे.