Thailand Open 2024 : सात्विक-चिरागचा विजयी धडाका कायम; थायलंड ओपनचे पटकावलं विजेतेपद…

Thailand Open 2024 : – भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने थायलंड ओपनमध्ये चमकदार कामगिरी करत चीनच्या लिऊ यी आणि चेन बो यांग यांचा पराभव करत थायलंड ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे या स्टार भारतीय जोडीने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला बळ दिले.

पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीला बळकटी देत, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील भारतीय जोडी सात्विक-चिरागने अंतिम फेरीत २९ व्या क्रमांकावर असलेल्या विरोधी संघावर २१-१५, २१-१५ असा सरळ आणि आक्रमक विजय मिळवला. आशियाई खेळांच्या विजेत्या जोडीचे हे हंगामातील दुसरे बीडब्ल्युएफ वर्ल्ड टूर विजेतेपद आहे आणि त्यांच्या कारकिर्दीतील नववे विजेतेपद आहे. याच जोडीने मार्चमध्ये फ्रेंच ओपन सुपर ७५० चे विजेतेपद पटकावले होते. दोघेही मलेशिया सुपर १००० आणि इंडिया सुपर ७५० मध्ये उपविजेते ठरले होते.

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यानंतर सात्विक दुखापतीमुळे आशियाई चॅम्पियनशिप खेळू शकला नाही. थॉमस कपमध्येही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. विजयानंतर चिराग म्हणाला, बँकॉक आमच्यासाठी खास आहे. आम्ही येथे २०१९ मध्ये प्रथमच सुपर सीरिज आणि त्यानंतर थॉमस कप जिंकला.

WTT Feeder Cappadocia 2024 : भारताच्या आकाश पाल-पोयमंती बैस्या जोडीनं पटकावले मिश्र दुहेरीचे विजेतेपद…

चिनी जोडीने थायलंड ओपनची एकही गेम न गमावता अंतिम फेरी गाठली. लिऊ आणि चेन यांनीही अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात चमकदार कामगिरी केली पण भारतीय जोडीच्या उत्कृष्ट फॉर्मला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.