3 लाख चुकीचे नकाशे चीन नष्ट करणार

बीजिंग – अरुणाचल प्रदेश आणि तैवान हे चीनच्या नकाशामध्ये न दाखवल्याबद्दल सुमारे 3 लाख नकाशे नष्ट करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. हे जगाचे नकाशे नेदरलॅन्डला निर्यात करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चार जणांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णयही चीन सरकारने घेतला आहे. गेल्याच महिन्यात चीनी सरकारने 30 हजार जगाचे नकाशे चूकीचे आहेत असे सांगून नष्ट केले होते. या नकाशांमध्ये भारताबरोबरची सीमा अयोग्यप्रकारे दाखवली होती आणि तैवान हा स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आला होता, असे चीनने म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग म्हणून चीनने कधीही मानला नाही. अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणूनच चीनमध्ये ओळखले जाते. भारतीय नेत्यांकडून वेळोवेळी अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवरही चीनने आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही देशांमधील 3,488 किलोमीटरच्या प्रत्यक्ष ताबारेषेबाबतचे वाद मिटवण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत.

Leave a Comment