आर्य लोक हे मूळचे भारतीयच

पुणे  – हरियाणातील राखीगडी येथील उत्खननात नव्याने उपलब्ध पुरातत्वीय पुरावा व डीएनए वरून आर्य लोक बाहेरून आले आहेत, हा समज निराधार आहे. आर्य हे लोक मूळचे दक्षिण आशियाई अर्थात भारतीय आहेत, असा दावा पुरातत्व अभ्यासक आणि डेक्‍कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आर्य मूळचे भारतीय होते, की बाहेरून आले, यावर वादविवाद आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राखीगडी येथील उत्खननातून काढलेले निष्कर्ष महत्त्वपूर्ण म्हणावे लागतील. डेक्कन कॉलेज, हार्वर्ड मेडिकल स्कुल, बिरबल सहानी इन्स्टिट्यूट, सीसीएमबी, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा जगभरातील प्रख्यात संशोधन संस्थांमधील 28 शास्त्रज्ञांनी तीन वर्षे अथक प्रयत्न करून हरियाणातील राखीगडी येथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांमधून यशस्वीरीत्या डीएनए मिळवला. या संशोधनाचे नेतृत्व पुण्यातील डेक्कन कॉलेजचे माजी संचालक प्रा. वसंत शिंदे यांनी केले. त्यांनी या संशोधनातील निष्कर्ष तपशीलवार माहिती दिली.

हडप्पा संस्कृतीतील राखीगडी हे महत्त्वाचे शहर मानले जाते. त्याठिकाणी उत्खननाचे काम 2008 पासून सुरू होते. त्यासंबंधीचे रिपोर्ट उपलब्ध असून, पुराव्यासह संशोधन करण्यात आले आहे. या हडप्पा संस्कृतील सर्व विकासाचे टप्पे स्पष्ट होतात. राखीगडीत जे टप्पे सापडले, यात विकासाचे सर्व टप्पे स्पष्टपणे दिसत आहेत. सध्या आपल्याकडे जशी ग्रामीण संस्कृती आहे तशी त्या काळीदेखील होती, असेही यातून स्पष्ट होत आहे. तसेच राखीगडी येथे सापडलेल्या सांगड्यांतील डीएनए हा हरियाणा ते बंगाल आणि काश्‍मीर ते अंदमान येथील लोकांमध्ये सातत्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे जो दावा केला जातो, की द्राविड हे मूळचे भारतीय होते आणि आर्यांनी आक्रमण केले तो चुकीचा आहे. दक्षिण आशियातील लोकांच्या धर्म, जात या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे डीएनए एकच आहेत. त्यामुळे धर्म जात या नंतर प्रस्थापित झाल्याचा दावा प्राध्यापक वसंत शिंदे यांनी केला.

Leave a Comment