दिल्लीत वातावरण तापले ! विधानसभेच्या आवारात आप-भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आवारात आज सत्ताधारी आप आणि विरोधी भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बुधवारी जोरदार निदर्शने केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. आम आदमीपक्षाचे आमदार पिवळे टीशर्ट आणि केजरीवालांच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून विधानसभेच्या आवारात आले होत.

मोदी का सबसे बडा डर केजरीवाल असे वाक्य लिहीलेले फलकही त्यांनी सोबत आणले होते. त्याचवेळी केजरीवालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत भाजपचे आमदार आणि समर्थकही विधानसभेच्या गेट जवळ जमले होते. पोलिसांनी विधानसभेचे गेट लाऊन दोन्ही गटांना आत प्रवेश करण्यास नकार दिला. दोन्ही पक्षांनी एकाच वेळी आंदोलने केली त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.

भाजपच्या आमदारांनी फलक घेऊन मोर्चा काढताच, पिवळे टी-शर्ट घातलेले आप नेते आणि कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि ते भाजप पक्षाच्या आमदारांच्या मागे जाऊ लागले. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बिधुरी यांनी केली. ते म्हणाले की, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जवळपास डझनभर आरोप आहेत. जर उत्पादन शुल्क धोरण जागतिक दर्जाचे होते, तर त्यांनी ते मागे का घेतले? आम्ही केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत,” असे बिधुरी म्हणाले.भाजपचे कार्यकर्ते काळा वेष परिधान करून आले होते.

ते म्हणाले की दिल्ली सरकारचे दोन मंत्री आधीच तुरुंगात आहेत आणि आतिशी आणि सौरभ भारद्वाज देखील बनावट पत्र जारी केल्याप्रकरणी लवकरच तुरुंगात जाऊ शकतात.विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, आप आमदारांनी सभागृहाबाहेर निदर्शने केली आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीतून केजरीवाल यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.