राज्याच्या पणन सहसंचालकांचा मृतदेह नीरा नदीमध्ये सापडला

सातारा – राज्याच्या सहकारी संस्थेचे व पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय 50, रा. गोखलेनगर,मळ रा. तारगाव) गुरुवारी दुपारपासून सारोळा (ता. भोर) या परिसरातून बेपत्ता झाले होते. नीरा नदीपात्रात आज शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. मात्र, ही आत्महत्या की घातपात याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणे येथील शिवाजीनगर या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयातील सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे त्यांचे मित्र प्रदीप मोहिते यांची कार घेऊन गुरुवारी दुपारी कार्यालयातून बाहेर पडले. घोरपडे नेहमी कार्यालयातून साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असतात. मात्र, सायंकाळी सात वाजले तरी ते घरी आले नाहीत. त्यांचा मोबाइल बंद येत होता. त्यांच्या पत्नीने त्यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत घोरपडे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कार्यातून गेल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रदीप मोहिते यांच्या मोबाइलवर खेड शिवापूरच्या टोल नाक्‍यावरून फास्टटॅगचा संदेश प्राप्त झाला. नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमधील शिंदेवाडी गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर त्यांची कार सापडली. एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये सहसंचालक घोरपडे यांनी चहा पिल्याचे निदर्शनास आले.

नीरा नदीच्या पात्रालगत सीसीटीव्हीमध्ये एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असल्याचे आढळून आले. मात्र, नेमक्‍या कोणत्या व्यक्तीने उडी मारली हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. महाबळेश्‍वर ट्रेकर्स आणि शिरवळ रेस्क्‍यू तसेच स्थानिक मच्छीमार यांच्यामार्फत नीरा नदी पात्रात रात्रभर शोध कार्य सुरू होते. अखेर आज सकाळी घोरपडे यांचा मृतदेह हाती लागला. या घटनेमाचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न शिरवळ पोलिसांकडून सुरू आहे

तारगावमध्ये खळबळ
रहिमतपूर – तारगाव (ता. कोरेगाव) येथील माजी सैनिक निवृत्त कॅप्टन पतंगराव आण्णासाहेब घोरपडे (वय 84) यांचे शशिकांत घोरपडे चिरंजीव आहेत. तारगाव परिसरातील उच्च विद्याविभूषित असणारे घोरपडे राज्याचे पणन महासंचालक म्हणून काम करत होते. तारगावमध्ये त्यांचे आईवडील राहत आहेत. ते स्वतः कुटुंबासह पुणे येथे राहत होते. तर त्यांचे भाऊ श्रीकांत घोरपडे हेसुद्धा पुणे येथे राहत आहेत. तारगावमध्ये शशिकांत घोरपडे यांचे नेहमी येणे जाणे होते. आईवडिलांशी तसेच मित्रमंडळींशी ते नेहमी संपर्कात असायचे. परंतु, या घटनेमुळे तारगाव पंचक्रोशीत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शशिकांत घोरपडे यांची आत्महत्या की हत्या याची उलट सुलट चर्चा तारगावमधील ग्रामस्थांमधून होत आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी अंजली, विराज (वय 24) व शिवराज (वय 17) अशी दोन मुले आहेत.