मेडिकल कॉलेजचे काम बंद पडू दिले जाणार नाही

सातारा – मेडिकल कॉलेजचा प्ररश्‍न सातारा जिल्ह्यासाठी कळीचा आहे. त्याचे काम कधीही बंद पडू दिले जाणार नाही. संबंधित आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापनाशी अथवा माझ्याशी चर्चा करणे गरजेचे होते. जलसंपदाच्या करार तत्वावरील जागेमध्ये राहणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कोणी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसात राज्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्या संदर्भातील माहिती देण्याकरता शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य शासनाने काढलेल्या जनकल्याणाच्या 700 अध्यादेशांची माहिती त्यांनी पहिल्या टप्प्यात दिली. देसाई म्हणाले, “”राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडेतेरा हजार रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंतची मुदत तीन हेक्‍टरपर्यंत वाढवण्यात आली. राज्य शासनाने नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचा लाभ जिल्ह्यातील तीन लाख 85 हजार 101 शेतकऱ्यांना झाला असून त्या माध्यमातून त्यांना 880 कोटीची मदत झाली आहे. कोयनानगर येथे एनडीआरएफच्या धर्तीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असून त्याकरिता महसूल विभागाची जागा उपलब्ध झाली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी 15 मॉडेल स्कूल आणि 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण केली जाणार असून त्यासाठी राज्य शासन तसेच डीपीडीसी या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाटण तालुक्‍यातील आपत्तीग्रस्त नऊ गावांसाठी शंभर टक्के नागरिकांचे पुनर्वसन होण्याकरता राज्य शासनाने पाच कोटी रुपये जागा खरेदीसाठी ठेवले आहेत. तेथील नागरिकांना साडेपाचशे घरे एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून बांधून दिली जाणार आहेत.” जिल्ह्यामध्ये रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 775 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे शंभूराज यांनी सांगितले.

 

अंधेरीची पोटनिवडणूक युती म्हणून लढणार
अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये युती म्हणूनच आम्ही एकत्र लढणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू, असे त्यांनी सांगितले. याशिवाय समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करणारा असून राज्यात ज्या ठिकाणी 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत प्रति युनिट एक रुपये सोळा पैसे शुल्क आकारले असून शेतकऱ्यांसाठी एक रुपयाची सवलत देण्यात आली आहे. सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून 1094 उमेदवारांना थेट नियुक्ती दिली आहे तसेच राज्यात ज्या ठिकाणी 50 टक्के रिक्त आहेत अशा ठिकाणी 75 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे शंभूराजे यांनी सांगितले.