‘या’ कारणामुळे घडला अपघात ! बालासोर दुर्घटनेचे कारण आले समोर.. 296 जणांचा झाला होता मृत्यू

नवी दिल्ली – बालासोर येथे 2 जून रोजी झालेला रेल्वे अपघात रुळावरील अनधिकृत दुरुस्तीच्या कामामुळे झाला होता. अपघातापूर्वी बहनगा बाजार स्थानकाच्या लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 94 वर मंजुरीशिवाय दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, असे सीबीआयने आता तपासानंतर म्हटले आहे. त्यामुळे बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताचे कारण समोर येत आहे. या रेल्वे अपघातात 296 जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते.

सीबीआयने गुरुवारी भुवनेश्वरच्या विशेष न्यायालयात आपला अहवाल सादर केला. वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता यांच्या परवानगीशिवाय तेथे दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. त्यासाठी सर्किट डायग्रामही पास करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी, 7 जुलै रोजी सीबीआयने 3 रेल्वे अधिकाऱ्यांना सदोष मनुष्यवध आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांचा समावेश आहे. या तिघांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सीबीआयने जुलैमध्ये म्हटले होते. तपास एजन्सीने असा दावाही केला होता की, तीन आरोपींना माहिती होते की त्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांनी अपघाताची चौकशी करत जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात सिग्नलिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर मानवी चुकांना जबाबदार धरले होते.

असा झाला होता अपघात
2 जूनच्या संध्याकाळी चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्‍सप्रेस मुख्य मार्गाऐवजी मालगाडी उभी असलेल्या लूप लाइनमध्ये घुसली. मालगाडीला ट्रेनची धडक बसली. कोरोमंडल आणि मालगाडीच्या काही बोगी लगतच्या ट्रॅकवर विखुरल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच हावडा-बंगळुरू एक्‍स्प्रेस रुळावर विखुरलेल्या डब्यांना धडकली. या अपघाताची तिव्रता इतकी भयावय होती की संपूर्ण परिसरात मृत्यूचे तांडव मांडले होते. या अपघातात अद्यापही बरेच लोक बेपत्ता आहेत.