मोहिनी कायम; पण…

अलीकडच्या काळातील 1990 च्या दशकातील अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार शानू, एसपी बालसुबह्मण्यम, अभिजित या दिग्गज आणि एकाहून एक अवीट गाण्यांचा खजिना देणाऱ्या गायकांची गाणी रिऍलिटी शोजमधून म्हटली जातात तेव्हा त्यांचा टीआरपी आपोआपच वाढत जातो. यावरून या गायकांचे श्रोत्यांच्या मनावरील गारुड आजही कायम असल्याचे दिसते. मात्र, दुसरीकडे याच गायकांची आता स्टार कलांकाराकडून आणि संगीतकारांकडून उपेक्षा झाल्याचे दिसून येते. एकेकाळी तीस ते चाळीस चित्रपटांतून गाणे म्हणणारे गायक आता वर्षभरातून एखाद्याच चित्रपटात पार्श्‍वगायन करताना दिसतात.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल, जतिन ललित, अनू मलिक, कुमार शानू, अलका याज्ञिक, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती आदी मंडळींना रिऍलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पाहणे हा एक सुखद अनुभव ठरत आहे. या मंडळींच्या हजेरींमुळे कार्यक्रमाच्या टीआरपीत वाढ झाल्याचे सांगितले जाते. सध्याच्या काळात कोणते ना कोणते चॅनेल हे जुन्या मातब्बर कलाकारांना आपल्या कार्यक्रमात सामील करून घेण्यास उत्सुक असते. या कलाकारांच्या हजेरीने वातावरणात उत्साह संचारतो. श्रोते देखील “नॉस्टेलजिक’ होतात. एका रिऍलिटी शोमध्ये “कर्ज’मधील प्रसिद्ध धून ही गायक आणि संगीतकार अदनान सामी यांनी की-बोर्डवर वाजवली तेव्हा स्वत: संगीतकार प्यारेलाल शर्मा यांनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांना जुने दिवस आठवले. अशा रंजक घटना रिऍलिटी शोमध्ये पाहावयास मिळतात आणि श्रोतेही भारावून जातात.

अलीकडच्या काळातील 1990 च्या दशकातील दिग्गज गायकांचा उल्लेख केल्यास अलका याज्ञिक, उदित नारायण, कुमार शानू, अभिजित यांची गाणी जेव्हा वाजवली जातात, तेव्हा त्यांचा टीआरपी आपोआपच वाढत जातो. मात्र, दुसरीकडे याच गायकांची आता स्टार कलांकाराकडून आणि संगीतकारांकडून उपेक्षा झाल्याचे दिसून येते. एकेकाळी तीस ते चाळीस चित्रपटातून गाणे म्हणणारे गायक आता वर्षभरातून एखाद्याच चित्रपटात पार्श्‍वगायन करताना दिसतात.

तरीही उदित नारायण खूश
अलीकडेच मुंबई विमानतळावर एका पत्रकाराला उदित नारायण भेटले. नेहमीप्रमाणे त्यांचा हसरा चेहरा होता. ते एका तमिळ चित्रपटासाठी पार्श्‍वगायन करण्यासाठी चेन्नईला जात होते. उदित यांना पाहिल्यावर जुना जमाना आठवतो. एकेकाळी कोणत्याही सुपरहिट चित्रपटात उदित नारायण यांची तीन ते चार गाणी असायची. मात्र, गेल्या सात आठ वर्षांपासून त्यांचा आवाज ऐकायला मिळाला नाही. नवीन गायकाला संधी देण्याच्या नावाखाली नवीन संगीतकारांनी जुन्या गायकांना बाजूला केले आहे. यावर उदित म्हणतात की, मी माझ्या आवाजाला एका भाषेत कैद केले नाही. माझ्या करियरची सुरुवात ही नेपाळी गाण्याने झाली. त्यानंतर हिंदीशिवाय मैथिली, कन्नड, मराठी, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, मल्याळम, भोजपुरी, गढवाली, सिंधी, पंजाबी आदी देशातील प्रत्येक भाषेत गाणे म्हटले आहे. ही परंपरा अजूनही चालूच आहे. मला केवळ बॉलिवूडचेच गाणे म्हणायचे, असे कधीही ठरविले नव्हते. मला पार्श्‍वगायनाच्या ज्या काही ऑफर यायच्या, ते मी आव्हान म्हणून स्वीकारायचो. विशेष म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांपासून दोन-तीन चित्रपटात गाणे म्हणत आहे. यावर्षी त्यांनी सुपर -30 मध्ये गाणे म्हटले आहे. “जुगराफिया….’ हे गाणे श्रोत्यांना पसंतीस पडले.

कुमार शानू बिझी
केवळ उदितच नाही तर अनेक हिट चित्रपटात गाणे म्हणणारे अभिजित, कुमार शानू, सोनू निगम, एस. पी. बालसुब्र्रह्मण्यम, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, पोर्णिमा, साधना सरगम या गायकांची देखील हीच स्थिती आहे. एका दिवसात 28 गाण्यांचे रिकॉर्डिंग करणारे कुमार शानू आता वर्षभरात एक ते दोन हिंदी चित्रपटात गाणे म्हणताना दिसतात. एका अर्थाने ते हिंदी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडलेले दिसतात. अंधेरीच्या स्टुडिओत त्यांनी सांगितले की, काही संगीतकारांना मी आऊटडेटेड झालो आहे, असे वाटते. मात्र, मी आजही कामात व्यग्र आहे. बंगाल चित्रपटासाठी मी सतत गाणे म्हणत आहे. याशिवाय भोजपुरी, तमिळ, तेलगू, प्रत्येक भाषेतील गाण्यावरून मी बिझी आहे. मी गायक आहे. गाणे म्हटलं नाही तर काय करू. रिऍलिटी शोमधील माझी लोकप्रियता पाहून तुम्हाला या गोष्टींचा अंदाज येत असेल, असे कुमार शानू म्हणतात.

साधनाची कोणतीही तक्रार नाही
दुसरीकडे गायिका पोर्णिमा ही नेपाळी आणि मराठी चित्रपटात गाणे म्हणण्यात समाधानी आहे. तिने अनेक हिट गाणे दिले आहेत. तसेच साधना सरगमचे हिंदी चित्रपटसृष्टीशी नाते संपल्यागत जमा झाले आहे. मात्र, तिला तमिळ चित्रपटात मागणी आहे. ती म्हणते की, सध्या गाणे मिळत नसले तरी मला कशीाचीही खंत वाटत नाही. मी प्रत्येक प्रकारचे गाणे म्हणू शकते. ही गोष्ट मी अनेकदा सिद्ध करून दाखविली आहे. आता हिंदी नाही तर दक्षिणेतील संगीतकारांनी माझी गुणवत्ता ओळखली आहे. अशा स्थितीत जर मला एखादे हिंदी गाणे म्हणायची संधी मिळाली तर मला वेगळाच आनंद मिळतो.

कविताला शास्त्रीय संगीताचा बाज
अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटातील शास्त्रीय बाज कमी होत चालला आहे. अन्यथा कविता
कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल यांसारख्या गायिका मागे पडल्या नसत्या. कविता कृष्णमूर्ती ही अन्य प्रादेशिक भाषेत चांगल्या रितीने गायन करत आहेत. ती म्हणते, मी शास्त्रीय संगीतामुळे अधिक बिझी असते. हिंदीचे क्‍लासिकल बेस्ड गाण्यातच रुची असल्याचे ती म्हणते. अलीकडच्या गाण्यात धांगडधिंगा असल्याने तेथे गाणे म्हणण्यास स्वारस्य नसल्याचे त्या म्हणतात. प्रत्येक हिट चित्रपटाबरोबर नवीन गायक येत आहे. मात्र, एक दोन वर्षानंतर तो गायबच होतो. मात्र, आमच्या स्थितीत जराही बदल झाला नाही. आम्ही आजही केवळ संगीताबरोबरच राहात आहोत.

अलका याज्ञिक यांचे ध्येय
अलका याज्ञिक यांचा आवाज आता पहिल्यासारखा ऐकावयास मिळत नाही. लता मंगेशकर यांच्यानंतरची गायन क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याचे काम अलका याज्ञिक यांनी केले, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. 1981 ते 2000 पर्यंत तीन दशकं हिंदी चित्रपटसृष्टीत अलका याज्ञिक यांनी दबदबा निर्माण केला होता. आता अलका याज्ञिक यांचा आवाज दुसऱ्या भाषेत ऐकावयास मिळत आहे. सतत गाणे म्हणणे हे आपले ध्येय असल्याचे अलका म्हणते. लता मंगेशकर असतानाही अन्य गायकांनी देखील तत्कालीन काळात वीस तीस वर्षे राज्य केले आहे. ते केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर. मलाही त्या दिशेने जायचे आहे, असे अलका म्हणते. प्रादेशिक भाषेतील गाणे मी आव्हान म्हणून स्वीकारले होते. माझा आवाज तीन हिट चित्रपटानंतर गायब होईल, असा कधीही विचार केला नाही. मात्र, अनेक ठिकाणी माझ्याऐवजी एखाद्या अपरिपक्व गायिकेकडून गाणे म्हणून घेतले जाते, तेव्हा वाईट वाटते. काही संगीतकार तर काही गाणे स्वत:वरच फिट करतात. त्यावरून ते गाण्यावरून किती गंभीर आहेत, हे कळते. तसे म्हटले तर अनेक चांगल्या गायकांचे पलायन होण्यामागे हेच कारण असावे, असे अलका याज्ञिक म्हणतात.

सलमानने नाते तोडले
आजचा सुपरस्टार सलमान हा कितीही गाजावाजा करत असला तरी त्याच्या चित्रपटातील गाणे हे टाइमपास म्हणून जगासमोर आले. मात्र, संस्मरणीय ठरले नाहीत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्याने अनेक चांगल्या गायकांशी संबंध तोडले. सलमानच काय, कधीकाळी शाहरुख खानसाठी असंख्य गाणे म्हणणारे कुमार शानू, उदित, अभिजित, सोनू, शान हे गायक देखील शाहरुख खानपासून दूर गेले आहेत. सलमानबरोबर देखील असेच झाले. आजच्या घडीला कोणत्याही गायकाचा आवाज हा सलमानला फिट बसवला जातो. अन्यथा एस. पी. बालसुब्रह्मण्यम दूर गेले नसते. सर्वात जास्त त्याचा आवाजाचा ताळमेळ एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासमवेत बसला आहे. मैने प्यार किया, हम आप के है कौन या चित्रपटातील गाणे आठवा. आजही हे गाणे तितक्‍याच आवडीने ऐकले जातात. मात्र, त्या यशस्वी गायकाला सलमानपासून दूर जावे लागले. सुब्रह्मण्यम यांना याबाबत दु:ख व्यक्त करायचे नाही. कारण ते त्यांच्या स्वभावात बसत नाही.

म्युझिक लॉबीने बट्ट्याबोळ
अनेक संगीततज्ज्ञ म्हणतात, की हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचा बट्ट्याबोळ करण्यास म्युझिक लॉबीचा मोठा हात आहे. कुमार शानू, अभिजित, उदित आदी दमदार गायक देखील या म्युझिक लॉबीमुळे साइडलाइनला गेले. शाहरुख खानला पहिले हिट गाणे देणारा विनोद राठोड सांगतो की, शाहरुख खान जेव्हा भेटतो तेव्हा त्याला “दिवाना’ची आठवण करून द्यावी लागत नाही. शाहरुख खानशी मेळ साधणारा माझा आवाज आहे. मात्र, त्यानंतर शाहरुख खानसाठी डझनभर गायक आले. मी असून नसल्यासारखा होतो.

सोनम परब

Leave a Comment