खंडग्रास ग्रहणाचा अविष्कार न दिसल्याने नगरकरांचा विरस

वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण : ढगाळ वातावरणामुळे निराशा 

नगर  – वर्षा अखेरीस असलेले पाचवे आणि शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा अविष्कार ढगाळ वातावरणामुळे शहरात दिसू शकला नाही. त्यामुळे नगरच्या खगोल प्रेमींचा हिरमोड झाला. मात्र शेवटची काही मिनिटे सूर्यदर्शन झाल्याने खंडग्रास सूर्यग्रहणाच्या शेवटचा अविष्कार पाहता आला, त्यावरच नगरकरांनी समाधान मानले.

गेली चार-पाच दिवस ढगाळ वरावरण असल्याने अधून मधून तुरळकपणे सूर्यदर्शन घडत होते. 24 तारखेच्या सायंकाळ पर्यंत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तविल्याने नगरमधील खगोलप्रेमी वर्षाच्या शेवटी दिसणारा आणि वर्षातील शेवटचा खंडग्रास सूर्यग्रहणाचा शेवटचा अविष्कार पहायला मिळेल, अशी अशा बाळगून होते. ग्रहण पाहण्यासाठी म्हणून अनेकांनी काळ्या काचा, ग्रहण पाहण्याचे चष्मे, वेल्डिंगच्या काचा, इ. वस्तूंची तजवीज हि केली होती.

नगरकर आपापल्या इमारतींच्या गच्चीवरून नभांगणातील अविष्कार पाहण्यासाठी जमले होते. मात्र नभांगणातील हे नाट्य दाट नभांच्या पडद्याआड घडल्याने नगरकरांना ते दिसू शकले नाही.

उलटपक्षी 9 वाजेच्या दरम्यान पावसाची सर बरसल्याने नगरकरांचा पुरता हिरमोड झाला. मात्र पाउणे अकराच्या सुमारास ढग काहीसे विरळ झाल्याने खंडग्रास ग्रहणाच्या शेवटच्या काही घटका नगरकरांना पाहायला मिळाल्या. अनेकांनी ग्रहण काळातील घडणाऱ्या घडामोडींची नोंदही घेतली. साडे नऊच्या दरम्यान जेव्हा 80 टक्के सूर्य चंद्राच्या छायेने ग्रासला गेला त्यावेळी संध्याकाळ सारखे अंधारून आल्याने पक्ष्यांचा किलबिलाट सुरु होऊन पक्ष्यांचे थवे आकाशात उडतांना दिसले.

Leave a Comment