साताऱ्यात साकारली “मनाच्या प्रयोगशाळे’ची संकल्पना

श्रीकांत कात्रे
डॉ. अनिमिष चव्हाण यांचा उपक्रम; मानसिक ताणतणावातून “सुकून’ मिळविण्याचा प्रयत्न

सातारा  – जग गतीमान होत आहे. धकाधकीच्या जीवनात माणसाच्या जगण्यातील ताणतणाव वाढत चालले आहेत. अशा वेळी आपणाला कसे जगायचे होते आणि आपण कसे जगतोय, याची जाणीव करून देणारी आणि मानसिक स्वास्थ्य मिळवून देऊ शकेल, अशी आगळीवेगळी संकल्पना येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. आपल्या जगण्यात काही “सुकून’ राहिला नाही, असे म्हणण्यापासून दूर नेणाऱ्या या संकल्पनमुळे मनाची मरगळ झटकून उत्साहाने काम करण्यास प्रवृत्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

अत्याधुनिक साधनांच्या जमान्यात माणसे एकमेकांशी बोलत नाहीत, विसंवाद वाढला आहे. प्रत्येकाच्याच वाटचालीत मानसिक ताणतणाव चिंतेची भर टाकत आहेत. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने माणसाच्या मनातील अस्वस्थता दूर करून त्याला “सुकून’ मिळावा, या विचारातून ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणायचे ठरविले, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. “सुकून’ हा तसा उर्दू शब्द. मनात अस्वस्थता असली की आपणही “सुकून.. मिलता नही है,’ असं सहजंच बोलून जातो. हा “सुकून’ मिळण्यासाठी डॉ. चव्हाण यांनी त्याला चहा, वाचन आणि बरचं काही… अशी जोड दिली आहे.

डॉ. चव्हाण यांच्या येथील गुरूवार पेठेतील “रुक्‍मिणी कुंज’ या इमारतीत हा उपक्रम सुरू केला आहे. “चाय, किताब और बस सुकून’ असे नाव त्यांनी या संकल्पनेला दिले आहे. रविवारी काही प्रमुखांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. शहर आणि परिसरात एक नाविन्यपूर्ण, सर्वांगसुंदर, संपन्न करणारी अनुभूती घ्यायला हवी, अशा प्रकारच्या साऱ्या सजावटीतून हा उपक्रम इथे साकारला आहे. विविध दालनांमधून मन उत्साहित करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे.

अ बुक कॅफे वुइथ लायब्ररी रिडिंग, ब्रेन अँड माइंड जिम, आर्ट रूम, मिटींग अँड ऍक्‍टिव्हिटी रूम, कॉंन्फरन्स रूम यांसह डेलिशिअस स्नॅक्‍स अँड ब्रिव्हरेजेस अशा सुविधांनी युक्त अशा वातावरणात मनाला “सुकून’ देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आत प्रवेश केल्यावर वाचण्याचा मोह व्हावा, अशा आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली पुस्तके आपल्या नजरेस पडतात. आर्ट रूममध्ये विविध प्रकारच्या चित्रांच्या फ्रेम्स आपल्याला भुरळ घालतात. त्यातच विविध प्रकारची वाद्येही आपली कला प्रकट करण्यासाठी सिद्ध केलेली आहेत. ब्रेन अँड माइंड जिममध्ये मन स्वस्थ, शांत होण्यासाठी विविध प्रकारची साधने तैनात आहेत.

अगदी आपल्या मनात काय खळबळ सुरू आहे, याची जाणीव करून देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानही इथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही जण गटाने इथे आले तर त्यांच्यासाठी मिटींग व ऍक्‍टिव्हिटी रूम, कॉन्फरन्स रूम आहे. मनाची भूक भागविण्याबरोबरच या सर्वाच्या जोडीला पोटाची भूक भागविण्याची व्यवस्थाही इथे करण्यात आली आहे. मात्र, इथे मिळणारा चहा किंवा इतर खाद्यपदार्थ विशिष्ट पद्धतीने पोषक आहारच असेल याबाबतचा कटाक्षही पाळण्यात येणार आहे.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघान करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व वाहतूक व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी होते. माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उद्‌घाटनासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांनी आपल्या भाषणामध्ये या उपक्रमाची गरज व्यक्त केली. आयुष्य जगताना मनाप्रमाणे जगता आले नाही तर काही सुकून मिळत नाही. हा सुकून मिळविण्यासाठी सातारकरांनी या उपक्रमाचा फायदा घेण्याचे आवाहन सर्वांनी केले. या उपक्रमासाठी प्राची मास्तोळी, डॉ. वैशाली चव्हाण, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्या सुनीता कदम, स्मिता पोरे आदी प्रमुखांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Comment