लॉकडाऊनमुळे वृध्दांचे बेसुमार हाल

हातातले काम बंद, खाण्या पिण्याचे वांदे, सरकारचे अक्षम्य दूर्लक्ष

नवी दिल्ली : करोना साथीमुळे लादलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बसला. एक तर हातात असणारे काम बंद झाले किंवा त्यांच्या वेतनावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे चित्र एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या खाण्या पिण्याचे वांदे झाले तर सर्वात गरज असणाऱ्या या वर्गाकडे सरकारनेही पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.

द एल्डर स्टोरी : ग्राऊंड रिऍलिटी ड्युरिंग कोविड 19 या सर्वेक्षणाच्या अहवालाचे प्रकाशन सोमवारी झाले. ज्येष्ठ नागरिकांच्या अवहेलने विरोधातील जागतिक जनजागृती दिवसानिमित्त हेल्पएज इंडियाने हे प्रकाशन केले. त्यात 17 राज्यांतील आणि चार केंद्रशासित प्रदेशातील पाच हजार 99 वृध्दांचे सर्वेक्षण करण्यात आले.

या सवेक्षणानुसार 65 टक्के ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम झाला. त्यात 60 ते 69 वयोगटातील ज्येष्ठांवर 67 टक्के, तर 70 ते 79 वयोगटातील वृध्दांवर 28 टक्के परिणाम झाला. सर्वाधिक वृध्दांवर म्हणजे 80 पुढील वयोगटातील पाच टक्के परिणाम झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

घरातील कर्त्या पुरषाच्या कमाईवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने आपली जीवनशैली बाधित झाल्याचे 71 टक्के वृद्धांनी सांगितले. यातील 61 टक्के वृध्द हे ग्रामीण भागातील आहेत. तर 39 टक्के हे शहरी भागातील आहेत, असे हेल्पएजने नमूद केले आहे.

आरोग्यावरही परिणाम….

या अहवालात 42 टक्के ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला. त्यात 64 टक्के ग्रामीण भागातील तर 36 टक्के शहरी भागातील आहेत. त्यात 61 टक्के ज्येष्ठ (60 ते 69) आहेत. 31 टक्के वृध्द (70 ते 79) तर 8 टक्के अतीवृद्ध आहेत.

“प्रकृतीला असणारा धोका, सामाजिक एकारलेपण, उत्पन्नावर घाला आल्याने जगण्याचा संघर्ष असा तीनस्तरावर वृध्दांचा लढा लॉकडाऊनच्या काळात सुरू होता. देशात सामाजिक सुरक्षा यंत्रणा नसल्याने बहुतांश वृध्दांना आपल्या गरजा भागवण्यासाठी काम करावे लागते.
-रोहीत प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, हेल्पएज इंडिया)

अत्यावश्‍यक सेवा आणि वस्तू मिळवण्यात लॉकडाऊनमुळे अडचणी आल्याचे 78 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले आहे. अन्न, किराणा आणि औषध या सर्वात आवश्‍यक वस्तू मिळवतानाही आपली दमछाक झाल्याचे या वृध्दांनी सांगितले. त्यानंतर घरगुती कामात मदत आणि बॅंकिंग सेवेतही व्यत्यय आल्याचे या ज्येष्ठ नागरिकांनी नमूद केले.

अत्यावश्‍यक सेवा आणि वस्तू मिळवण्यात अडचणी आलेल्यांमध्ये 84 टक्के ग्रामीण भागातील होते. तर 71 टक्के शहरी भागातील होते. आपल्याच घरात या काळात आपन एकटे पडल्याची भावना 61 टक्के जणांनी व्यक्त केली. यात शहरी आणि ग्रामीण भागात सारखेच प्रमाण होते.

बहुतांश वृध्द हे असंघटीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ते अकुशल असतात. त्यामुळे दैनदिन रोजगारावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. या वर्गाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. त्यांना मदतीची सर्वात जास्त गरज असताना त्यांचा धोरणकर्त्यांना विसर पडला. त्यांच्यासाठी विशेष समन्वयाच्या कृती कार्यक्रमाची आवश्‍यकता होती. मात्र सरकार, समाज आणि अगदी कुटुंबियांनीही त्यांच्याकडे दूर्लक्ष केले.

Leave a Comment