“महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा”

मुंबई – आपल्या पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपल्या निवासस्थानी पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी, पक्षातील बंडखोरांना आणि भाजपला महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवण्याचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थानाने पाडले गेले आहे, ती कृती लोकांना आवडली आहे काय याचीही यानिमित्ताने जनमत चाचणी होईल. त्यात जर आम्ही पराभूत झालो तर आम्ही जनतेचा तो निर्णय मान्य करू, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

11 जुलै रोजी 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेचेच नव्हे तर भारतीय लोकशाहीचेही भविष्य ठरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे. बंडखोरांच्या विरोधात आपली भूमिका कठोर करत ठाकरे यांनी म्हटले आहे की, ज्यांनी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर अत्यंत वाईट टीका केली, आपल्या मुलांचे आयुष्यही उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यांच्याशीच पक्षातील बंडखोर आमदार जुळवून घेत असतील तर ते “मातोश्री’ आणि ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याचा दावा कसा करू शकतात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही आता बंडखोर गटाने दावा सांगायला सुरुवात केली आहे, त्याविषयी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, कायद्यानुसार शिवसेनेकडून कोणीही धनुष्यबाण चिन्ह काढून घेऊ शकत नाही. मी हे घटनातज्ज्ञांशी बोलल्यानंतर सांगत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार असल्याचे म्हटले होते.

भाजपशासित राज्यात हनुमान चालीसा पठण केल्याने ५ हजारांचा दंड

ठाकरे म्हणाले की, लोक मतदान करताना केवळ पक्षाचे चिन्ह बघत नाहीत, तर ते व्यक्‍ती आणि उमेदवार शिवसेनेचा आहे की नाही हे देखील पाहतात. ते म्हणाले की, एक, 50 किंवा 100 आमदारांनी पक्ष सोडला तरी पक्षाचे अस्तित्व संपत नाही. सध्या काही नगरसेवक शिवसेनाला सोडून जात असल्याचे सांगितले जात आहे पण आता महापालिका बरखास्त अवस्थेत आहेत. त्यामुळे सध्या कोणीही नगरसेवक नाहीत, ते माजी नगरसेवक असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

मुख्यमंत्री-सोमय्या भेटीनंतर शिंदे गटात नाराजी; ठाकरेंना माफिया म्हणणाऱ्या सोमय्यांना…