ठेकेदाराचा ‘रात्रीस खेळ चाले’! अंधाराचा फायदा घेत कॉंक्रिटीकरणाचा प्रकार

खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

यवत : दौंड तालुक्‍यातील यवत ते नाथाचीवाडीचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. भरदिवसा होणारे रस्त्यांचे काम दौंड तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात दिवे लावून कॉंक्रिट रस्ते करण्यात येत आहेत. असाच नाथाचीवाडी येथील एका रस्त्याचा करेक्‍ट कार्यक्रम ठेकेदाराने राजरोसपणे केल्याने तालुक्‍यात चर्चा चालू झाली आहे.

यवतकडून नाथाचीवाडीकडे रस्ता दुरूस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेतीन किलोमीटर रस्त्याला एक कोटी 81 लाखांचा आणि दुरुस्तीसाठी बारा लाख साठ हजार रुपयांचा अधिक निधी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मिळाला आहे.
दुरुस्ती आणि मूळ रस्त्यांची रक्कम पाहता या रस्त्यासाठी सरकार दोन कोटी रुपये खर्च करीत असून ठेकेदार मात्र या विभागाच्या शाखा अभियंता यांच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याचे 3.200 किमीचे रस्त्याचे खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिकांचे मत आहे. उरलेल्या तीनशे मीटर रस्त्याचे पीसीसीचे व कॉंक्रीटिकरणाचे काम हे रात्रीच्या सुमारास केल्याने नागरिकांच्या मनात याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. नेमके रात्रीच्या वेळी ही पीसीसी आणि कॉंक्रीट करण्यामागचा ठेकेदाराचा हेतू असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.

रस्त्याचे काम चौफुला परिसरातील कोकरे अँड कंपनीला या बड्या ठेकेदाराला मिळाले आहे. रात्रीच्या अंधारात उजेड करून कॉंक्रिटीकरणाचा रस्ता करण्याचा प्रताप रस्त्याचे काम करणारे ठेकेदाराच्या कंपनीने केले आहे. या रस्त्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाचे अभियंता चेतन शिंदे यांची नेमणूक झालेली आहे. शिंदे हे पुणे येथील कार्यालयात सुद्धा सहजासहजी आढळून येत नाही.

बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांना रात्रीच्यावेळी काम करता येते का, याबाबत विचारणा केली असता तर हो रात्रीच्या वेळी हे पीसीसीचे आणि कॉंक्रीटकरणाचे काम करता येते. गुणवत्तेबाबत त्यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळले.
– चेतन शिंदे, अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना.

रस्त्यावर केलेले खडीकरण उखडले असून रात्रीच्या वेळी पीसीसीचे कामाबाबत विचारणा केली असता, ते काम रात्रीच्यावेळी करता येते, कार्यकर्ते जरा त्यांची नावे जरा मला व्हॉट्‌सऍपला पाठवा. कोणाला काय अडचण असेल तर तिथे त्यांना आपण रस्त्यावर उभे करू. काय पाहिजे असेल तसे काम करून घेऊ. त्यांच्याकडून भले उलट माझे दोन सुपरवायझर कमी करतो. म्हणजे ती लोक काम करून घेतील.
-विठ्ठल कोकरे, ठेकेदार.

नाथाचीवाडी येथील येथील रस्त्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळी कॉंक्रीटीकरण केले आहे. नक्‍कीच हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. आत्ताच केलेले खडीकरण हे देखील उखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भविष्यात रस्ता लवकरच खराब झाल्याशिवाय राहणार नाही. संबंधित रस्ता कामाची चौकशी झाली पाहिजे.
-दिगंबर ठोंबरे, युवा कार्यकर्ते नाथाचीवाडी.