‘कोरोना’चं थैमान,अकरा राज्यांत करोनाचे संकट वाढले

नवी दिल्ली  -केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कोविड-19 च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर, कोविड प्रतिबंधक क्षेत्रे आणि व्यवस्थापन याविषयीच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत, महाराष्ट्र, छत्तिसगढ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

12 एप्रिल रोजी देशात एका दिवसांत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली. ही रुग्णसंख्या एका दिवसातली जगातली सर्वाधिक संख्या होती, असेही यावेळी सांगण्यात आले. या सर्व 11 राज्यांनी त्यांच्या दररोजच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची क्षमता आधीच ओलांडली असून काही जिल्हे, जसे मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, लखनौ, रायपूर, अहमदाबाद आणि औरंगाबाद मध्येही हीच स्थिती उद्भवली आहे.
कोविड रूग्णांवर त्यांच्या आरोग्याच्या गांभीर्यानुसार, उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या त्रिस्तरीय आरोग्य सुविधांअंतर्गत, 2084 समर्पित कोविड रुग्णालये, 4043 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे आणि 12,673 कोविड शुश्रुषा केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण 18,52,265 खाटा आहेत.

त्यापैकी 4,68,974 खाटा समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये आहेत. यावेळी, राज्यांना नव्या जीवनरक्षक प्रणालींचा पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन डॉ हर्ष वर्धन यांनी दिले. 1121 व्हेंटीलेटर्स महाराष्ट्राला, 1700 उत्तरप्रदेशाला, 1500 झारखंडला, 1600 गुजरातला, 152 मध्यप्रदेशला आणि 230 छत्तिसगढ या राज्यांना दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या राज्यांकडे मिळून सुमारे 1 कोटी 58 लाख लसींच्या मात्रा शिल्लक आहेत. तर आणखी 1 कोटी 16 लाख 84 हजार मात्रा वितरणाच्या प्रक्रियेत असून त्या पुढच्या आठवड्यात वितरीत केल्या जातील.
राज्यांना या कोविडकाळात त्यांच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत मिळालेल्या वार्षिक निधीपैकी 50 टक्के निधी वापरण्याची परवानगी देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही, राष्ट्रीय आरोग्य मिशनचा, एक एप्रिल 2021 पर्यंत न वापरलेला निधी कोविड व्यवस्थापनासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे, याचा पुनरुच्चार या बैठ्‌कीत करण्यात आला.

Leave a Comment