74 लाखांच्या थकबाकीपोटी मनपाने रेल्वेचे पाणी तोडले

नगर – मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी अहमदनगर महानगरपालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली असून, याचा फटका रेल्वे विभागाला बसला आहे. सुमारे 74 लाख रुपयांच्या सेवा कराच्या थकबाकीपोटी महापालिकेने रेल्वेचे पाणी तोडले आहे. ही कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांच्या पथकाने केली.

रेल्वे प्रशासनाकडे कोट्यवधी रुपयांच्या कराची थकबाकी होती. यात मालमत्ता कराचा समावेश होता. शासनाच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या कार्यालयांना मालमत्ता कर आकारता येत नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला केवळ सेवा कराचे बील देण्यात आले होते. मात्र वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वेने कर भरला नाही. रेल्वेकडे 74 लाख 10 हजार 788 रुपयांची थकबाकी असून त्यापोटी रेल्वेचे नळ कनेक्‍शन तोडण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी दिली. महानगरपालिकेने थेट रेल्वे प्रशासनाचे पाणी बंद केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एस.एस पुंडकर, निरीक्षक व्ही.व्ही. जोशी, यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Comment