देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, पण सरकार निवडणुकीच्या राजकारणात गुंतलेय – यशवंत सिन्हा

नवी दिल्ली – सध्या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकिची झाली असून सरकार निवडणुकांच्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे या आर्थिक हालाकिच्या स्थितीकडे लक्ष नाही असे तृणमुल कॉंग्रेसचे नेते व वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

सरकारने लोकानुनय करण्याच्या योजनांवर निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठा खर्च केला. त्याचाही विपरित परिणाम देशाच्या अर्थकारणावर झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे, सरकारला तूट नियंत्रणात ठेवायला साफ अपयश आले असून देशातील विदेशी गुंतवणूकही कमी झाली आहे यातून देशाची अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे असे ते म्हणाले.

देशाची वित्तीय तूट एकूण जीडीपीच्या 6.9 टक्‍क्‍यांवर जाण्याचा अंदाज आहे. सरकारच्या उद्दिष्ठापेक्षा हा आकडा मोठा आहे. देशातील काही कार्पोरेट घराणी प्रचंड नफा कमवत आहेत, पण गरीब आणि मध्यमवर्गींयांची स्थिती दयनीय झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.