सतरंज्या उचलण्याचे दिवस संपले…!

सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षगळती सुरू आहे. आपल्या पक्षातील नेते, पदाधिकारी गेल्यामुळे काहींना वाईट वाटत असेल. मात्र, वर्षानुवर्षे फक्त सतरंज्या उचलण्याऱ्या सच्चा कार्यकर्त्यांना आता महत्त्व येणार आहे. सतरंज्या उचलण्याचे दिवस आता संपले आहेत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते पहिल्या फळीत येऊ लागले असून वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणारे नेते बाजूला झाले आहेत. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सत्तेत नसणाऱ्या पक्षांना गळती लागली आहे. काहीही करून आपण भाजप-शिवसेनेत जाऊन निवडून आल्यास आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेवर अव्वल फळीतील नेते, पदाधिकारी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. मात्र, आपला पक्ष वाढला पाहिजे, सत्ता मिळायला पाहिजे, त्यातून आपल्या मतदारसंघाचा, राज्याचा विकास होईल, यासाठी नेत्यांची आज्ञा शिरसावंद मानून प्रामाणिकपणे काम करण्यास दुसरी फळी नेहमी तत्पर असते. सकाळ झाली की पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा. नेत्यांच्या सभांना हजेरी लावायची. पडेल ती कामे करायची. पक्षासाठी वाहून घ्यायचे, यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कधीही आपण मोठे व्हावे, असे वाटले नाही. पण, आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना डिमांड आहे.

Leave a Comment