अहमदनगर – पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता

नगर  – नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणामधून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून जोरदार पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मात्र पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय पाणी सोडता येणार नाही अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला असून मराठा आरक्षणामुळे आधीच वातावरण तापलेले असताना त्यात पाणी सोडल्यास मराठवाडा विरुद्ध नाशिक, नगर असा तीव्र संघर्ष निर्माण होऊ शकतो. हे पाहता सध्या तरी पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तब्बल 8.603 टीएमसी पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा नर्णय झाला आहे. 31 ऑक्‍टोबरपासून हे पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं. रा. तिरमनवार यांनी दिले आहे.

येत्या एक ते दोन दिवसात नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांमधून 5 टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. पाणी सोडण्यासाठी आवश्‍यक तो पोलीस बंदोबस्त लागणार आहे. मात्र सध्या राज्यभर मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलन पाहता व काही ठिकाणी या आंदोलनाला मिळालेले हिंसक वळण लक्षात घेता. पाणी सोडणे अशक्‍य आहे.

नगर व नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी याला विरोध दर्शविला असून आता पाणी न सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू होत आहे. उद्यापासून संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे उपोषण करणार आहे. त्यामुळे हे लोण उत्तर नगर जिल्ह्यात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक असा संषर्घ उभा राहण्याची शक्‍यता आहे. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अधिच मराठा आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडला असतांना पाणी सोडण्याचा वाद नव्याने सुरू झाल्या पोलीस यंत्रणेला सुरक्षा देणे अशक्‍य होणार आहे. त्यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याचा विषय लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील पोलीस बंदोबस्त मिळाला तरच पाणी सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.