पुणे | निर्णय आज जाहीर करणार : शिवतारे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्याची घोषणा करणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शिवतारे हे शनिवारी सासवडमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत.

पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मात्र, माध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती करताच शिवतारे यांनी काढता पाय घेतला. शिवतारे म्हणाले, राजकरणात कोणी कोणाचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो.

मी लोकसभा लढावी, ही कार्यकर्त्यांची मागणी होती. राजकारण हे स्वत:साठी नाही लोकासांठी असते. त्यामुळे या बैठकीत झालेली माहिती प्रमुख कार्यकर्त्यांना देऊन त्यांच्या भावना सासवड येथे बैठकीत जाणून घेणार आहे.

त्यानंतर गरज भासल्यास त्यांना सोबत घेऊन पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. असे सांगितले. मात्र, या भेटीनंंतर तुमचा सूर नरमल्याचे दिसते ? अशी विचारणा करताच, त्यांनी माध्यमांना हात जोडून काढता पाय घेतला. त्यामुळे, आज शिवतारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.