उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांची मागणी निराधार- ॲड शिंदे

कोपरगाव – उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांचे उपोषण हे निराधार असून या जागांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नसून याचिकाकर्ते व उपोषण करणारे बाळासाहेब जाधव यांनी उलट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. विद्यासागर शिंदे यांनी दिला.

साईबाबा तपोभूमी येथील सभागृहात पञकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या ट्रस्टच्या वतीने कायदेशीर बाजू मांडली. ॲड. शिंदे पुढे म्हणाले की, शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने ५० एकर ३३ गुंठे जागा आहे, ती जागा शासकीय मालकीची जरी असली तरी न्यायालयीन बाब आहे. शासनाने ज्या हेतूसाठी सन १९५२ साली जागा दिली त्या हेतूपासून संबंधित संस्था दूर गेली नाही. काळानुसार शेती व शेतकऱ्यांमध्ये जसजसा बदल होत गेला तसतसे येथेही बदल होत गेले. शेतकऱ्यांसाठी व्यवसायिक गाळे बांधले, शेतकी प्रदर्शन भरवले जाते. या ट्रस्टचा कारभार शासकीय नियमानुसार चालतो. ट्रस्टच्या वतीने जे जे बांधकाम केले ते रितसर शासकीय सर्व परवानग्या घेऊन केले.

नगरपालिकेचा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेण्यात आला आहे. कोणतेही काम नियमबाह्य केले नाही. न्यायालयाचा कोठेही अवमान केला नाही. तीन ठिकाणी न्यायप्रविष्ट बाब असल्याने काही बाबी उघड बोलता येणार नाही. उपोषण करणारे बाळासाहेब जाधव यांना या सर्व गोष्टींची कल्पना असूनही उपोषण करत आहेत. यावरून जाधव हे न्यायालयाचा आदेशाचा अवमान करून शासनाला वेठीस धरत आहेत. ते एक विशिष्ट हेतू मनात ठेवून उपोषण करत आहेत.

माञ, न्यायप्रविष्ट बाब असताना बोलू शकत नाहीत तर नवीन काॅलसेंट अथवा नव्याने बांधकाम कसे करता, यावर ते म्हणाले की, आम्ही बांधकाम करण्याच्या परवानग्या रितसर घेत आहेत. काही मिळाल्या तर काही मिळणार आहेत. त्यामुळे बांधकाम करतोय असे म्हणून ट्रस्टची बाजू भक्कमपणे मांडत संबंधीत जागा व जागेवरील सर्व काही रितसर चालू असल्याची दिली.

आ. काळे यांचे नो काॅमेंटस
या संदर्भात आमदार आशुतोष काळे यांना विचारले असता ते म्हणाले की, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा जो काही विषय आहे तो न्याय प्रविष्ट असल्याने कायदेशीर जे काही असेल ते असेल. त्यावर मी सध्या काही बोलणार नाही, असे म्हणत या विषयाला बाजूला केले.