उद्योगपती वाधवान बंधूंच्या अडचणीत होणार वाढ

महाबळेश्‍वर  -लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदीचा आदेश धुडकावून पुणे जिल्ह्यातून महाबळेश्‍वरात आलेले वादग्रस्त उद्योगपती कपिल व धीरज वाधवान यांनी केवळ जिल्हाबंदीच नव्हे तर जलतरण तलावात पोहण्यास मनाई असलेला आदेशही धुडकावल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सीबीआयच्या कोठडीत असलेल्या वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अनेक आदेश काढले आहेत. पर्यटनस्थळांवरील अनेक खाजगी बंगल्यांमध्ये मालक व त्यांच्या कुटुंबीयांनाच राहता येईल, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे अनेक धनिकांना बंगले रिकामे करावे लागले होते. पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स, बंगल्यांमधील खाजगी जलतरण तलाव व जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव बंद करण्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला होता. त्यानुसार महाबळेश्‍वर पालिकेने हॉटेल्स व खाजगी बंगल्यांमधील जलतरण तलावांमधील पाणी सोडून ते मोकळे केले होते. काही ठिकाणी पडदे टाकून हे तलाव बंद केले होते.

कपिल व धीरज वाधवान हे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राच्या आधारे जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून कुटुंबीय व नोकरचाकरांसह लोणावळ्यातून 8 एप्रिलला महाबळेश्‍वरला आले. येथे आल्यावर या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. आता वाधवान यांनी केवळ जिल्हाबंदीच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आणखी एका आदेशाचीही पायमल्ली केल्याचे उघडकीस आले आहे. जलतरण तलाव बंद ठेवण्याचा आदेश असतानाही वाधवान कुटुंबीयांनी त्यांच्या “वाधवान हाऊस’ या खाजगी बंगल्यातील जलतरण तलावात पोहण्याचा आनंद लुटला. त्याचे पुरावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा तलाव अजूनही पाण्याने भरलेला आहे.

Leave a Comment