25 एप्रिलपासून उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे; तुम्ही सुद्धा यात्रेला जाण्याचा विचार करताय, तर ‘ही’ बातमी….

नवी दिल्ली – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे.

दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी डोली उत्सव हिमालयातील मंदिराकडे रवाना करण्यात आला आहे. हिवाळ्यात बाबा केदारनाथ यांचे स्थान उकीमठ येथे नेले जाते. तेथून ही डोली आता केदारनाथ मंदिराकडे रवाना करण्यात आली असून ही डोली 24 तारखेला केदारनाथ येथे पोहचणार आहे. तर, बाबा केदारनाथचे दरवाजे उद्या 25 एप्रिलपासून उघडणार आहेत, त्यासाठी प्रशासन स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान, तुम्ही देखील येथे जाण्याचा विचार करत असाल, तर या गोष्टी आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सध्या तरुण पिढीला येथे पोहोचण्याचं वेड लावलं आहे. तरुणांसाठी तर इथे येणं हे त्यांचं स्वप्न बनलं आहे. पण काही तरुण फारशी माहिती न घेता फक्त मनाला वाटतंय म्हणून प्लान करतात आणि चालू पडतात. केदारनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

हे मंदिर भारताच्या उत्तराखंड राज्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक विविध राज्यातून केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचीवर आहे, त्यामुळे हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. त्यानंतर मुसळधार बर्फवृष्टीमुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात येतात.

जर तुम्ही केदारनाथ धामला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त जाणे टाळा. डोंगराळ भागात पावसाळ्यात पूर किंवा भूस्खलनाचा धोका खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत या काळात प्रवासाचे नियोजन करू नका. गौरीकुंड ते केदारनाथ धाम जायला एकूण 5-6 तास लागतात. त्यामुळे घाई न करता आरामात चालत जा.

जर तुम्हाला केदारनाथ धामला कोणत्याही त्रासाशिवाय पोहोचायचे असेल तर तुम्ही डोलीवर जाऊ शकता, ज्याचे भाडे 8 ते 10 हजार रुपये आहे. त्याचबरोबर खेचराचे फेरीचे भाडे पाच ते सहा हजार रुपये आहे. जर तुम्ही हेलिकॉप्टरने जाण्याचा विचार करत असाल तर त्याचे भाडे सुमारे 7 हजार रुपये आहे. उत्तम फोन नेटवर्कसाठी, केदारनाथ यात्रेला जाताना BSNL, Vodafone आणि Reliance Jio चे सिम सोबत ठेवा. तसेच तुमचे आधार कार्ड देखील सोबत ठेवायला विसरू नका.