वांद्रयाची घटना पूर्वनियोजित – किरीट सोमय्या

मुंबई : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय जमले होते. तसेच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, वांद्रयात जी घटना घडली त्याचा एक व्हिडीओ आला आहे. तो मी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. यामध्ये दोन तरूणांचे संभाषण आहे. यामध्ये ते पोलीस कुठे आहेत. मीडिया कुठे आहे, असं विचारताना दिसत आहेत. तसेच सर्वांना सांगा आम्हाला गावी जायचं आहे. अन्यथा 15 हजार रूपये रोख द्या. याचा अर्थ ही घटना पूर्वनियोजित होती, असे वाटत असल्याचे ते म्हणाले. ज्या ठिकाणी चार लोकं एकत्रित येऊन देत नाही. त्या ठिकाणी 4 हजार लोकं एकत्रित येईपर्यंत पोलीस कुठे होते, असा सवालही त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला आहे.

शिवसेना भाजपाचे आरोप प्रत्यारोप
करोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीला झुगारून वांद्रे पश्‍चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाल्यावरून आता राजकारण तापले असून या मजुरांना आपापल्या राज्यात घरी जाण्यासाठी 24 तासांसाठी का होईना रेल्वेची सोय करावी ही महाराष्ट्र सरकारची मागणी केंद्र सरकारने मान्य न केल्यामुळे हा प्रकार घडल्याची टीका करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले. तर ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रसंगी राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू न केंद्र सरकारवर टीका करून पळ काढत आहे हे दुर्दैवी असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Leave a Comment