मारूतीच्या दादागिरीमुळे जम बसवण्यात आले अपयश ; फोर्ड आणि अन्य चार वाहन कंपन्या भारतातून बाहेर पडल्या

नवी दिल्ली – वाहन उत्पादन क्षेत्रातील जगप्रसिद्ध फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केली असून भारतातील वाहनांची बाजारपेठ किती गुंतागुंतीची आणि शिरकाव करण्यास कठीण आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भारतीय रस्त्यांवर मारूतीच्या वाहनांची दादागिरी आहे.

भारतातील वाहन बाजारपेठेतील मोठा हिस्सा मारूतीनेआणि अन्य चीनी व कोरियातील कंपन्यांनी व्यापलेला आहे आणि अशा या बाजारपेठेत अमेरिकेतील जनरल मोटर्स (जीएम) आणि फोर्डसारख्या नावाजलेल्या कंपन्या स्वतःचे स्थान  टिकवून ठेवू शकल्या नाहीत.

सध्या भारतातील वाहन उद्योगावर काहीसे मळभ निर्माण झाले आहे. वाहन उद्योगाला
लागणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स चिप्सची कमतरता, सुट्या भागांच्या पुरवठ्यातील अडचणी,
करोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे द्विधा मनस्थितीत असलेले ग्राहक आणि मोटार विक्रीतील घसरण अशा सगळ्या गोष्टींची चिंता असताना भारतातील वाहन उद्योगासाठी महत्त्वाचा असलेला दसरा-दिवाळीचा काळ तोंडावर येऊन ठेपलेला आहे.

अशा स्थितीत अमेरिकेतील डेट्रॉईट येथे मुख्यालय असलेल्या वाहन क्षेत्रातील आघाडीच्या फोर्डकंपनीने 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत वाहन उत्पादन थांबवणार असून भारतातील गाशा
गुंडाळत असल्याचे जाहीर करून वाहन क्षेत्रावरील मळभ आणखी गडद केले. फोर्डने 1995
मध्ये भारतात पाऊल ठेवले.

2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून वाहन उत्पादनाचे दोन प्रकल्प उभारले. वर्षाला चार लाख चार चाकी वाहने उत्पादीत करण्याची या प्रकल्पांची क्षमता आहे. कंपनीत सध्याच्या घडीला चार हजार कायमस्वरुपी कर्मचारी आणि कामगार आहेत.

त्याचबरोबर कंपनीचे देशभर 170 डिलर असून त्याठिकाणी काम करणारे चाळीस हजारांहून अधिक कामगार-कर्मचारी आहेत. आता या सगळ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फोर्डवर ही वेळ येणार हे स्पष्ट दिसत होते. गेल्या दहा वर्षात कंपनीला सुमारे दोन अब्ज डॉलर एवढा संचित तोटा झालेला आहे.

आता फोर्डच्या भारतातील एक्‍झिटचे विश्‍लेषण अनेक पद्धतीने
करता येईल. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, भारतातील वाहन उद्योगाची बाजारपेठ अतिशय गुंतागुंतीची आणि प्रवेश करण्यास कठीण अशी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना या बाजारपेठेत शिरकाव करणे आणि बस्तान बसवणे सहजासहजी शक्‍य होत नाही. फोर्डने त्यासाठी अतिशय नियोजनबद्ध प्रयत्न केले.

बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी त्यांनी महिंद्रा कंपनीबरोबर सहकार्याचे करार केले, वाहनांची लोकप्रिय मॉडेल बाजारपेठेत आणली. त्यातील अनेक मॉडेल यशस्वी ठरली. 1999 पासून फोर्ड आयकॉन ते मॉन्देवो, फ्युजन, फिगो, फिएस्टा, एन्डेव्हर आणि कंपनीची बेस्ट सेलर इको-स्पोर्ट अशी अनेक मॉडेल कंपनीने बाजारपेठेत आणली.

फोर्ड खेरीज जनरल मोटर्स, यूएम मोटारसायकल्स, मान ट्रक्‍स (फोक्‍सवॅगन समूहातील कंपनी),फियाट, आयशर पोलारिस या परदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनी यापूर्वी भारतातून गाशा गुंडाळलेला आहे.

फोर्ड इंडियाचा प्रवास आणि शेवट
1995 – महिंद्र अँड महिंद्रासोबत भागीदारी करून भारतात पाऊल ठेवले.
1998 – महिंद्राबरोबरील भागीदारी संपल्यानंतर कंपनीने स्वबळावर काम सुरु केले.
2019 – बाजारपेठेत जम बसवण्यासाठी धडपडत असलेल्या फोर्ड इंडियाने पुन्हा महिंद्राबरोबर
जॉईंट व्हेंचरची घोषणा केली.
31 डिसेंबर 2020 – फोर्ड-महिंद्रा जॉईंट व्हेंचर रद्द झाल्याची घोषणा.
9 सप्टेंबर 2021 – आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीपासून वाहन उत्पादन बंद
करण्याची घोषणा केली. सध्या भारतात कंपनीचे दहा लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

भारतीय वाहन उद्योगावर मारूतीचे वर्चस्व
मारुती 37.7 %,ह्युंदाई 19.1 %,टाटा मोटर्स 11.4 %
,किया 6.8 %,टोयोटा 5.2 %,महिंद्रा 5 %,होंडा 4.6 %,रेनॉं 4 %,निस्सान+डॅटसन 1.3 %,फोक्‍सवॅगन 0.7 %,जीप + फियाट 0.5 %,फोर्स 1.1 %,सिट्रॉन 0 %

(सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्स – सियामकडील आकडेवारीनुसार विविध वाहन कंपन्यांच्या ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या विक्रीवरून काढण्यात आलेला बाजारपेठेतील हिस्सा)