“समृद्धी’चा पहिला टप्पा लवकरच खुला होणार – एकनाथ शिंदे

नागपूर – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्‍झिट पॉईंट्‌सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी केली. तसेच या महामार्गावर इलेक्‍ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्यांचे काम देखील सुरू आहे. या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली.

वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत. तसेच वन्यजीवांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.