शिर्डीत तब्बल 27 दिवसांनंतर आज होणार उड्डाण

शिर्डी  – कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेल्या 27 दिवसांपासून बंद असलेले येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळवरील विमान सेवा उद्या (बुधवार) सुरू होत आहे. त्यामुळे विमान करणाऱ्यांनी सुटकेचा निश्‍वाःस सोडला आहे. स्पाईस जेट बुधवारपासून सेवा सुरू करीत आहे. औरंगाबाद विमानतळावर हलविलेली यंत्रणा स्पाईस जेटने पुन्हा साईबाबा विमानतळावर आणली आहे. बुधवारपासून या कंपनीची सहा विमाने जातील आणि सहा येतील, अशी बारा उड्डाणे होणार आहे.

यात दिल्ली व चेन्नई प्रत्येकी एक तर बंगळूर व हैद्राबादला दोन फेऱ्या मारण्यात येतील. त्यानंतर यात वाढ होईल. विशेष म्हणजे पहिल्या दिवसासाठी 70 टक्‍के आगाऊ बुकिंगही झाले आहे. इंडिगो व एअर इंडियाही लवकरच आपली सेवा सुरू करणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेल्या 14 नोव्हेंबरपासून शिर्डी विमानतळ बंद होते. यामुळे जवळपास साडे सातशे उड्डाणे रद्द करण्यात आली.

दरम्यानच्या काळात धावपट्टीवर दृष्यमानता वाढण्यासाठी विद्युतीकरण करण्यात आले असून 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डीजीसीएने (डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हील ऐव्हीऐशन) काही दिवसासाठी मर्यादित अनुमती दिली आहे. तीन आठवड्यात काम पूर्ण होईल. त्यानंतर डीजीसीएकडून नाईट लॅन्डींगसह कायमस्वरूपी अनुमती मिळेल. चोवीस तास सेवा सुरू होण्यासाठी किमान दीड महिना लागेल, असे शास्त्री यांनी सांगितले.

या विमानतळावर रोज अठ्ठावीस उड्डाणे होत होती. प्रवासी संख्येच्या निकषावर विमानतळ राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतर चौथ्या क्रमांकावर पोहचले होते. रोज येथून दीड हजाराहून अधिक प्रवाशांची ये-जा सुरू होती. विमानसेवा बंद झाल्याने भाविकांचे हाल झाले. काही विमाने औरंगाबादला वळविण्यात आल्याने तिकडून वाहनाने येताना खराब रस्त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या बंदचा विमानतळ विकास कंपनी, विमान कंपन्यांबरोबरच साईदर्शनाला येणारे व्हीआयपी, हॉटेल व्यवसाय व विमानतळावरील टॅक्‍सी स्टॅन्डला फटका बसला. येत्या दोन महिन्यात पूर्वीपेक्षाही अधिक क्षमतेने हा विमानतळ रन झालेला दिसेल, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

Leave a Comment