मुख्यमंत्री पदामागे छुपा गेम; प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला टोला

नगर – महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्या नावाने मुख्य मंत्रिपदाच्या दावेदारीची चर्चा सुरू असली, तरी यामागे काहीतरी छुपा गेम दिसतो, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसू लागले आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे लगावला.

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मागील महिन्यात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेण्यासाठी आंबेडकर नगरला आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचे अनेक जण स्वप्न बघत आहेत, पण त्यांचे तिकीट वाटपही अजून झालेले नाही. खुद्द शरद पवार यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आधी तिकीटवाटपावर एकाग्रता करावी, तिकीटवाटपाचा विषय भिजत ठेवायचा व दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांची चर्चा करायची, पण ज्यांच्या चौकशी सुरू आहेत, तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार दिसत आहेत, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

अहिल्यानगर नाव गैर नाही
अहमदनगर या नावामागे इतिहास आहे. मात्र, आता नव्याने दिलेले अहिल्यानगर नाव गैर नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी जन्मस्थळ नगर जिल्ह्यात आहे व होळकर घराण्याचे राज्य त्यांनी पुढे चालवले आहे, परंतु त्याच्या प्रशासकीय व लष्करी कर्तव्याची चर्चा होत नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत हा विषय आम्ही ठाकरेंवर सोडला आहे, असे ते म्हणाले.

लव्ह जिहादचा प्रचार खोटा
मागील चार वर्षांत राज्यातून 35 हजार महिला व मुली गायब आहेत. त्याबाबत लव्ह जिहाद असा प्रचार सुरू असून, ही बाब मी खरी मानत नाही, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले की, प्रेमाला लव्ह जिहादचे नाव देऊन वातावरण खराब करणे योग्य नाही.